सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 आढावा बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, पणनमंत्री जयकुमार रावल, नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, मुख्य सचिव राजेशकुमार, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, संबंधित विभागांचे सचिव उपस्थित होते. नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी सादरीकरणाद्वारे नियोजनाची माहिती दिली. जिल्हाधिकारी जलज शर्मा, आयुक्त मनीषा खत्री, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त करिश्मा नायर हे उपस्थित होते.
advertisement
गर्दीचे नियोजन, कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचे तसेच रस्त्यांची व मलनि:स्सारणाची कामे वेगाने पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याचे गेडाम यांनी सांगितले.
नदीपात्रातील पाणी स्वच्छ राहील यावर कटाक्षाने भर द्यावा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सिंहस्थ कुंभमेळा हा धार्मिक श्रद्धेचे प्रतीक आहे .संपूर्ण कुंभमेळा कालावधीत रामकुंडात आणि नेहमीसाठीच नदीपात्रातील पाणी स्वच्छ राहील हे कटाक्षाने पहावे. मलनि:स्सारणाची कामे प्राधान्याने हाती घेवून पूर्ण करण्यात यावीत. विमानतळे आणि रेल्वे सुविधांची कामेही गतीने पूर्ण करावीत. नाशिकमधील नवीन रिंग रोडचे काम त्वरित पूर्ण करावे. या कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. यासाठी संबंधित विभागांनी आवश्यक निधी त्वरित मंजूर करुन घ्यावा. इतर रस्त्यांची कामेही त्वरित हाती घेण्यात यावी. कामे अपूर्ण राहिल्याने नागरिकांची गैरसोय होता कामा नये याकडे लक्ष द्यावे. विविध आखाड्यांशी चर्चा करून त्यांच्या गरजेनुसार साधूग्राममध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. सीसीटीव्ही कॅमेरे प्रणाली केंद्रीकृत पद्धतीने तयार करण्यात यावी. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 'एआय'च्या विविध पर्यायांचा वापर करण्यात यावा. 'मार्व्हल'चाही उपयोग करून घेण्यात यावा. पोलिसांच्या निवासासाठीची व्यवस्था प्राधान्याने करण्यात यावी. द्वारका सर्कल येथील कामे त्वरित पूर्ण करावी. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेव्दारे बस सेवेचे नियोजन करण्यात यावे. वाहनतळांच्या ठिकाणी भंडारा/लंगरची व्यवस्था करण्यात यावी असे निर्देश फडणवीस यांनी दिले.