राज्यातील महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजण्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात बंद दाराआड रात्री दीड तास बैठक पार पडली.या चर्चेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणही उपस्थित होते.
बैठकीत काय झालं?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे यांसह राज्यातील सर्व महापालिका निवडणुका महायुतीने एकत्रितपणे लढण्याबाबत सकारात्मक संकेत या बैठकीतून मिळाले आहेत. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये याबाबत प्राथमिक स्तरावर सहमती होताना दिसत असून, पुढील दोन ते तीन दिवसांत स्थानिक पातळीवर महापालिका-निहाय चर्चेला वेग येणार आहे.
advertisement
भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात सुरू असलेल्या परस्पर सुरू असलेल्या इनकमिंगला आता मनाई करण्यात आली आहे. दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या गोटात कार्यकर्ते ओढून घेण्याच्या कार्यक्रमाला पूर्णविराम देण्याचे ठरवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे युतीतील संभाव्य तणाव टाळण्याचा प्रयत्न केला आहे.
मोठ्या महापालिका निवडणुकांचा रोडमॅप तयार करण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये जागावाटप, स्थानिक समीकरणे आणि उमेदवारी प्रक्रिया यावर स्थानिक पातळीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. नगरपालिका निवडणुकीतील मतभेद दूर सारत महायुतीमधील भाजप आणि शिंदे गटाने आता एक पाऊल पुढे टाकले आहे.
