महाविकास आघाडीमध्ये नवा भिडू नको, असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज ठाकरे यांच्या महाविकास आघाडीतील घटक पक्ष होण्याबाबत विरोध दर्शवला होता. पण त्यानंतर राज ठाकरे हे महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेसह निवडणूक आयोगाला भेटायला गेलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळात होते. त्यामुळं राज ठाकरे महाविकास आघाडीत सहभागी होण्याबाबत शक्यता वर्तविण्यात येत आहेत.
advertisement
नाना पटोले नक्की काय म्हणाले?
अशात आता काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज ठाकरेंबाबत मोठं विधान केलं आहे. महाविकास आघाडीचे नेते राज ठाकरेंबाबत दिल्लीला प्रस्ताव पाठवतील आणि हायकमांडकडून निरोप आल्यानंतर राज ठाकरेंच्या महाविकास आघाडीतील समावेशाबाबत निर्णय घेतला जाईल, असं मोठं विधान नाना पटोले यांनी केलं आहे. नानांच्या या वक्तव्यानंतर राज ठाकरे यांचा महाविकास आघाडीतील प्रवेश निश्चित समजला जात आहे. एकीकडे विद्यमान प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी विरोध केला असताना नाना पटोलेंच्या वक्तव्यानंतर काँग्रेसमधील मतभेद समोर आले आहेत.
निवडणूक आयोग भाजपचा बाहुला, त्यांनीचं लोकशाहीचा खून केलाय
यावेळी नाना पटोले यांनी मतदार याद्यांमधील घोळावर देखील भाष्य केलं. मतदार यादीमध्ये घोळ झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. यावर आता निवडणूक आयोगानं जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. पण नरेंद्र मोदी यांचं सरकार देशात आलं तेव्हापासूनचं निवडणूक आयोगाचे कार्यालय हे भाजपचं कार्यालय झालं असून तिथूनच भाजपचं कामकाज चालते. निवडणूक आयोग भाजपचा बाहूला बनला असून लोकशाहीचा खून त्यांनी केल्याचा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे.