मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सर्व वरिष्ठ नेत्यांनी एकमुखाने “काँग्रेसच्या एकला चलो रे” असा ठाम सूर लावल्याचे सूत्रांनी सांगितले. आगामी मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसेसोबत आघाडी करण्यास स्पष्ट नकार देण्यात आला आहे. त्याशिवाय, शिवसेना ठाकरे गटासोबतही युती न करण्याची भूमिका काँग्रेस नेत्यांनी घेतली आहे.
advertisement
बैठकीदरम्यान विधानसभा निवडणुकीच्या निकालांचा संदर्भ देत काही नेत्यांनी स्पष्ट केले की, “गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या मतदारांचा फायदा शिवसेना (उद्धव ठाकरे गटाला) झाला, पण काँग्रेसला त्याचा फायदा मिळाला नाही. त्याशिवाय, ठाकरेंमुळे अल्पसंख्यांक मतदार काँग्रेसकडून दूर जात असल्याची चिंताही बैठकीत व्यक्त झाली. महाविकास आघाडीच्या समीकरणात शिवसेनेला सर्वाधिक फायदा होत असताना काँग्रेसची ताकद कमी होत असल्याची भूमिका या बैठकीत मांडण्यात आली. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने स्वतंत्रपणे मैदानात उतरावे असा सूर उमटला आहे.
राज्यात सत्ताबदल, शिवसेनेतील फूट आणि विरोधी आघाड्यांमधील बदलत्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मुंबईतील संघटन मजबूत करण्यावर भर दिला आहे. मुंबई प्रदेश काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत स्वबळावरील भूमिकेवर अधिक जोर दिला. मनसे किंवा शिवसेनेसोबत आघाडी केल्यास काँग्रेसचे स्वतंत्र अस्तित्व धोक्यात येईल, असा मुद्दा मांडण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.