मुंबई: मुंबई महापालिकेच्या निवडणुकांचा बिगुल वाजताच सर्व पक्षांनी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव आणि राज हे एकत्र येण्याच्या हालचाली सुरू आहेत. तर, दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या युतीच्या टाळीबाबतही काँग्रेसने मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती होणार असल्याच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे काँग्रेसदेखील या दोघांसोबत युती करणार का, याची चर्चा सुरू होती. त्यातच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी काँग्रेससोबत असावी अशी राज ठाकरेंची भूमिका असल्याचे सांगितल्यानंतर मनसेच्या मविआ प्रवेशाबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडत आहे. या बैठकीत महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासह प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह खासदार वर्षा गायकवाड, युबी व्यंकटेश, बी एम संदीप, नसीम खान, भाई जगताप, मधु चव्हाण , अस्लम शेख , सचिन सावंत आदी उपस्थित आहेत.
ठाकरे बंधूंसोबत मुंबईत आघाडी? काँग्रेसचं काय ठरलं
मुंबई महापालिकेच्या बैठकीच्या अनुषंगाने काँग्रेस नेत्यांमध्ये रणनितीवर चर्चा झाली. काँग्रेसने या वेळी ठाम भूमिका घेत मुंबईत स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मनसेसोबत आघाडीची शक्यता नाकारण्यात आली असून शिवसेना ठाकरे गटासोबतही कोणतीही तडजोड न करण्याचा सूर बैठकीत उमटल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राज्यात सत्ताबदल, शिवसेनेतील फूट आणि विरोधी आघाड्यांमधील बदलत्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मुंबईतील संघटन मजबूत करण्यावर भर दिला आहे. मुंबई प्रदेश काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत “स्वबळावर लढा” ही भूमिका मांडण्यात आली. मनसे किंवा शिवसेनेसोबत आघाडी केल्यास काँग्रेसचे स्वतंत्र अस्तित्व धोक्यात येईल, असा मुद्दा मांडण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
काँग्रेस आता थेट मुंबईतील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी तयारीला लागली आहे. स्थानिक कार्यकर्त्यांना बूथस्तरावर सक्रीय करण्याबरोबरच “हात” या पक्षचिन्हाचा प्रचार मोठ्या प्रमाणात करण्यावर पक्षाने भर दिला आहे. मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसला गेल्या काही निवडणुकांमध्ये अपेक्षित यश मिळाले नव्हते. त्यामुळे यावेळी पक्षाने नव्या रणनितीसह मैदानात उतरण्याचा निर्धार केला आहे.