47 वर्षीय महिलेचा मृत्यू कशामुळे?
कल्याणमध्ये एका 47 वर्षीय महिलेचा कोविड आणि टायफॉइडच्या दुहेरी संसर्गामुळे मृत्यू झाला. ती मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) आठ दिवसांतील कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेली पाचवी व्यक्ती ठरली आहे. विशेष बाब म्हणजे, महिलेची कोविड चाचणी तिच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर स्थानिक आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. या महिलेवर गेल्या 10 दिवसांपासून टायफॉइडसाठी ओपीडीमध्ये उपचार सुरू होते. मात्र शुक्रवारी सकाळी तिची प्रकृती अचानक खालावली. तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर संध्याकाळी तिचा मृत्यू झाला. त्यावेळी कोविड चाचणीचा रिपोर्ट आलेला नव्हता.
advertisement
कडोंमपा अधिकाऱ्यांनी काय सांगितले?
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ला यांनी सांगितले की, महिलेवर आधीपासून तापाचे उपचार सुरू होते. कोविडची लक्षणं स्पष्ट नव्हती, मात्र मृत्यूनंतर चाचणी घेतल्यावर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. कडोंमपाचे उपायुक्त (आरोग्य) प्रसाद बोरकर यांनी सांगितले की, सध्या कल्याण-डोंबिवली परिसरात तीन कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी एकाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, दुसऱ्या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. तिसरा रुग्ण कळवा येथील महानगरपालिका रुग्णालयात उपचार घेत आहे.
या घटनेनंतर केडीएमसीने पावलं उचलली आहेत. रुक्मिणीबाई आणि शास्त्री नगर रुग्णालयात आरटीपीसीआर लॅबसह आयसोलेशन वॉर्ड सुरू करण्यात आले आहेत. "घाबरण्याचं कारण नाही. कोविडचा बहुतांश वेळा सौम्य फॉर्म असतो, परंतु लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळेवर चाचणी घेणे महत्त्वाचे आहे," असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
रुग्णाची संख्या वाढली...
दरम्यान, राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, रविवारी 43 रुग्णांची नोंद झालेली संख्या सोमवारी 69 वर पोहोचली. त्यापैकी 37 रुग्ण मुंबईतील होते, त्यानंतर ठाण्यात 19 आणि नवी मुंबईत सात रुग्ण होते. पुण्यात दोन रुग्ण आढळले. तर पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, रायगड आणि लातूरमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला. काही आठवड्यांपूर्वी कोविडच्या संख्येत वाढ सुरू झाली, जानेवारीपासून नोंदवलेल्या एकूण 285 रुग्णांपैकी मे महिन्यात 269 रुग्णांची नोंद झाली. 18 मे पासून कोविडने इतर चार रुग्णांचा मृत्यू झाला. किडनीच्या समस्येने ग्रस्त 14 वर्षांची मुलगी, 59 वर्षांचा कर्करोगाचा रुग्ण, 70 वर्षांचा हृदयरोगी आणि मधुमेहाशी संबंधित केटोअॅसिडोसिसचा 21 वर्षांच्या रुग्णाचा समावेश आहे.