पुण्यात मंगळवारी भाजप नेत्यांची एक पक्षांतर्गत बैठक झाली. या बैठकीत दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणावरून भाजपच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी डॉ. घैसास यांच्या क्लिनिकची केलेली तोडफोड, त्यावर खासदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केलेली नाराजी आदी मुद्दे चर्चेत येणार असल्याचा अंदाज होता. या बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार मेधा कुलकर्णी आदी उपस्थित होते.
advertisement
चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळांकडून पाठराखण...
या बैठकी डॉ. घैसास यांच्याविरोधात झालेल्या आंदोलनाचे पडसाद बैठकीत उमटले. राज्याचे महसूल मंत्री आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या महिला आघाडीच्या आंदोलनावर टीका करणे अयोग्य असल्याचे म्हटले. चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, महिला आघाडीने केलेले आंदोलन हे संघटनेसाठी होते. आंदोलन करताना ते चुकीच्या पद्धतीने झाले देखील असेल, पण यामुळे कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होता कामा नये, अशा शब्दांत आपली भूमिका स्पष्ट केली.
तर, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील महिला आघाडीच्या आंदोलनाची पाठराखण केली. मोहोळ यांनी आपला अनुभव सांगताना म्हटले की, '19 वर्षांपूर्वी आंदोलन करताना माझ्याकडून तोडफोड झाली होती. ती चुकीचीच होती, पण कार्यकर्ता म्हणून पक्ष माझ्या पाठीशी उभा राहिला. तुम्ही जशास तसे उत्तर द्यायला शिकायला हवं. एखादा पक्षाचा नेता चुकीचं सांगत असेल तर तुम्ही चुकीचं बोलताय असं म्हणायला शिका असे मोहोळ यांनी म्हटले.
मेधा कुलकर्णी पक्षात एकाकी?
कोथरुडच्या माजी आमदार आणि राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी या पक्षात एकाकी पडल्याचे चित्र असल्याची चर्चा आहे. मेधा कुलकर्णी यांच्या भूमिकेच्या विरुद्ध धीरज घाटे यांनी आधीच मत व्यक्त केले होते. त्यानंतर आता चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांनीदेखील विरुद्ध भूमिका घेतल्याने भाजपमधील अंतर्गत संघर्ष उफाळण्याची चिन्हे आहेत.