भाजपने बहुमताचा आकडा पार केला असून 48 जागांवर आघाडी मिळवली आहे. सलग तीन वेळा दिल्ली काबीज करणाऱ्या आम आदमी पार्टीला यंदाच्या निवडणुकीत दारुण पराभवाचा सामना करावा लागत आहे. आप केवळ 22 जागांवर आघाडीवर आहे. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडीतील आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने आघाडी न करता निवडणूक लढवली. आप आणि काँग्रेसने एकत्र निवडणूक लढवली असती तर भाजपसमोर आव्हान निर्माण झाले असते अशी चर्चा सुरू आहे. राष्ट्र्वादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी दिल्लीत विधानसभा निवडणुकीची आकडेवारी देत इंडियाच्या आघाडीच्या नेत्यांना थेट सवाल केला आहे.
advertisement
''भाजपची ‘बी टीम’ प्रमाणेच काम...'' रोहित पवारांनी काय म्हटले?
रोहित पवारांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की, दिल्लीच्या जंगपुरामध्ये मनीष सिसोदिया 700 मतांनी पराभूत झाले तर काँग्रेसच्या सुरी यांना 7350 मते मिळाली. नवी दिल्लीत अरविंद केजरीवाल जवळपास 3400 मतांनी पराभूत झाले, तिथं काँग्रेसच्या संदीप दीक्षित यांना 4500 हून अधिक मते मिळाली, कस्तुरबानगरमध्ये काँग्रेस उमेदवाराचा 11000 मतांनी पराभव झाला तर ‘आप’ला 18000 मते मिळाली. 20 हून अधिक मतदारसंघात अशीच काहीशी स्थिती आहे.
दोन्ही पक्षांनी समन्वय साधला नाही, परिणामी अहंकार आणि इगोमुळे दोन्ही पक्ष कळतनकळत भाजपची ‘बी टीम’ प्रमाणेच काम करून गेले, ही शोकांतिका आहे. या निकालातून धडा घेऊन #INDIA आघाडीचे नेते किमान यापुढच्या निवडणुका तरी समन्वयाने लढतील का? हा खरा प्रश्न आहे, असे रोहित पवारांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले.
विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडी निष्प्रभ?
काँग्रेस आणि आप हे इंडिया आघाडीतील घटक पक्ष आहे. लोकसभा निवडणुकीत या आघाडीने चांगले यश मिळवले तरी सत्तेपासून दूर राहावे लागले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला फारशी प्रभावी कामगिरी करता आली नाही. हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या पक्षांना अपयशाला सामोरे जावे लागत आहे.