मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात सर्व नवनिर्वाचित भाजप नगरसेवकांचे अभिनंदन केले. या यशाचे शिलेदार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील, धीरज घाटे तसेच सर्व भाजप आमदारांचे अभिनंदन केले.
पुण्यात चुरशीची लढाई मीडियाने दाखवली पण लढाई एकतर्फी झाली
फडणवीस म्हणाले, अतिशय आनंद होतोय की पुण्यात भाजपने इतिहास रचलेला आहे. माझ्या डाव्या उजव्या बाजूला बसलेले नेते आणि तुम्ही या सगळ्या विषयाचे शिल्पकार आहात. पुण्याच्या इतिहासात इतके प्रचंड बहुमत गेले 30-35 वर्षात मिळाल्याचे मी तरी कुठल्या पक्षाला पाहिलेले नाही. पुणेकरांनी मोदीजींच्या विकासाच्या अजेंड्यावर मोहर उमटवलेली आहे. पुण्यात फार चुरशीची लढत आहे असे मीडियामध्ये दाखवले जात होते. आपल्या कार्यकर्त्यांनी चुरशीच्या लढतीला एकतर्फी केलं त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.
advertisement
...तर पुढचे 25 वर्ष आपल्याला कोणी हलवू शकणार नाही
आपण आकडे काढणारी लोकं नाहीत पण तुम्ही जो आकडा आणला आहे तो फारच अप्रतिम आहे. एवढे बहुमत मिळतो तेव्हा आनंद होतोच दुसरीकडे जबाबदारही वाढतात. प्रचंड मोठ्या अपेक्षेने पुणेकरांनी आपल्याला बहुमत दिले आहे. जर त्यांच्या पात्रतेला आपण पात्र ठरलो तर पुढचे 25 वर्ष आपल्याला कोणी हलवू शकणार नाही. जर पुणेकरांच्या विश्वासाला पात्र ठरलो नाही तर हा विजय लाटेसारखा निघून जाईल. कुठल्याच विजयानंतर मोदीजी शांत बसत नाहीत. लगेच पुढच्या पाच वर्षाचे विकासाचे व्हिजन तयार करतात. आपल्यालाही पुण्याच्या विकासाचे नियोजन करायचे आहे, असे फडणवीस म्हणाले.
पदासाठी वाद नको, महानगरपालिका हा काही आपला कमिशनचा धंदा नाही
महापौर, स्टँडिंग कमिटीचे अध्यक्ष, सभागृह नेते, समित्या सगळ्या नेमल्या जातील. मात्र माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की यामध्ये कुणाला या वर्षी संधी मिळेल, कोणाला पुढच्या वर्षी संधी मिळेल. मात्र त्यापेक्षा पुणेकरांनी दिलेले बहुमत महत्त्वाचे आहे. पुणे महापालिकेतील पद घेण्या-देण्यावरून जर चर्चा झाली तर पुणेकर आपल्याला माफ करणार नाही. पक्ष ज्यांना जबाबदारी देईल, त्यांनी पारदर्शक कारभार करायचा आहे. महानगरपालिका हा काही आपला कमिशनचा धंदा नाही. महापालिका आपला व्यवसाय नाही. सामाजिक आर्थिक परिवर्तन म्हणून आपण हातात घेतलेले आहे, तशाच प्रकारचा व्यवहार महानगरपालिकेमध्ये सर्वांकडून अपेक्षित आहे, असे फडणवीस म्हणाले.
पारदर्शकतेचा अभाव मी कुठल्याही पद्धतीने सहन करून घेणार नाही
फडणवीस पुढे बोलताना म्हणाले, आनंदाच्या क्षणीच कडवट सांगितलेले बरे असते. महापालिकेत कुठल्याही पद्धतीने उन्माद, पारदर्शकतेचा अभाव मी कुठल्याही पद्धतीने सहन करून घेणार नाही. कोणी कितीही मोठा असला तरी महानगरपालिकेत जनतेने दिलेल्या बहुमतापेक्षा मोठे कोणी नाही. जर लोकांच्या अपेक्षा आपण पूर्ण करणार नसलो तर त्या जागेवर राहण्याचा आपल्याला अधिकार नाही. पुणेकरांना जे आश्वासन दिले आहे, ते येत्या दोन वर्षातच आपल्याला काम सुरू झालेले दिसेल. राज्याचे सरकार आणि केंद्राचे सरकार पूर्णपणे आपल्या पाठीशी आहे. देशातली एक नंबरची महापालिका झाली पाहिजे, असे आपण सगळे काम करू.
