याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दरवर्षी नवरात्रौत्सवात महाराष्ट्र आणि परराज्यातून लाखो भाविक तुळजापुरात येतात. त्यामध्ये अनेक पायी यात्रेकरूंचाही समावेश असतो. त्यामुळे तुळजापूरकडे येणाऱ्या लातूर, धाराशिव, सोलापूर, नळदुर्ग, लोहारा आणि कर्नाटक-उमरगा मार्गावर 24 तास सुरू असणारी 22 प्रथमोपचार केंद्रं सुरू करण्यात आली आहेत. प्रत्येक केंद्रावर एक आरोग्य कर्मचारी आणि एक आशा स्वयंसेविका आवश्यक औषधसाठ्यासह सेवा देणार आहेत.
advertisement
भाविकांना तात्काळ वैद्यकीय मदत देण्यासाठी तुळजापूरकडे येणाऱ्या सहा मुख्य मार्गावर तीन शिफ्टमध्ये 10 बाईक अॅम्ब्युलन्सची टीम कार्यरत असणार आहे. याशिवाय, 24 तास सेवेसाठी 25 रुग्णवाहिका उपलब्ध असून, यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील 12 रुग्णवाहिका आणि तुळजापूर शहरातील 13 रुग्णवाहिकांचा समावेश आहे. गंभीर रुग्णांसाठी शहरात पाच खाटांची दोन आय.सी.यु. केंद्रं तयार केली गेली आहेत.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तुळजापूर शहरातही 13 प्रथमोपचार केंद्रं सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रात एक वैद्यकीय अधिकारी आणि आरोग कर्मचारी उपलब्ध असतील. यात्रेदरम्या साथीचे रोग पसरू नयेत यासाठी 2 साथरोग प्रतिबंधात्मक पथकं नेमण्यात आली आहेत.
पायी फिरून आरोग्य सेवा
तुळजापूर शहरात आणि शहराच्या 1 किलोमीटर परिसरात पायी फिरून आरोग्य सेवा देण्यासाठी प्रथमोपचार किटसह 20 आरोग्य दूत नेमण्यात आले आहेत. हे आरोग्यदूत आरोग्यविषयक जनजागृतीचं कामही करतील. नियंत्रणासाठी उपजिल्हा रुग्णालयात 24 तास कार्यरत असलेला नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे.