विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी देखील सडकून टीका केली आहे.
धनंजय मुंडेंनी आपल्या भाषणात परळीतील जगमित्र कार्यालयाचा उल्लेख केला.याच कार्यालयात बसून वाल्मिक कराड सगळा कारभार हाकत होता. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा वाल्मिक कराडवर आरोप आहे. कराडच्या साथिदारांनी संतोष देशमुखची निर्घृण हत्या केली. सध्या कराड या प्रकरणी तुरुंगाची हवा खातोय. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडची जवळीक काही लपून राहिली नाही. त्यावरून धनंजय मुंडेंवर बरेच आरोपही झाले होते. पण आता नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्तानं धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडची आठवण झाली.
advertisement
खासदार बजरंग सोनावणे काय म्हणाले?
यावर बजरंग सोनावणे म्हणाले, धनंजय मुंडे यांना आज जर कोणाची लई जास्त आठवण येत असेल तर त्यांनी तिथे जाऊन बसावं त्यांना भेटावं... आमचं काही म्हणणं नाही. मागच्या दोन निवडणुकीमध्ये परळीतील नागरिकांना मतदान करण्याचा अधिकार देखील बजाऊ दिला नाही. दादागिरी दहशत बरेच काही प्रकार करून परळीच्या जनतेला फक्त बोटाला शाई लावली.मतदान करू दिले नाही. धनंजय मुंडेला आज जर कोणाची लय जास्त आठवण येत असेल तर त्यांनी तिथे जाऊन बसावं त्यांना भेटावं आमचं काही म्हणणं नाही.
काय आहे प्रकरण?
गेल्या डिसेंबर महिन्यात पवनचक्कीच्या वादातून संतोष देशमुख यांची निघृर्ण हत्या झाली होती. या हत्याप्रकरण आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे.तर एक आरोपी फरार आहे. वाल्मिक कराड हा या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार असल्याचा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला आहे. वाल्मिक कराडशी असलेल्या संबंधामुळं धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून पाय उतार व्हावं लागलं. गेल्या वर्षभराच्या काळात आपल्या बदनामीचा प्रयत्न झाल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केला आहे.
धनंजय मुंडेंच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापलं
तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडविषयी धनंजय मुंडेंना कळवळा आल्यानं विरोधकांसह सामाजिक
कार्यकर्त्यांनी टीकेची झोड उठवली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटले होते. त्यावरून धनंजय मुंडेंना विरोधकांसह स्वपक्षीयांनी घेरलं होतं. पण आता धनंजय मुंडेंच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे.
