धाराशिव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये धाराशिवमध्ये शिवसेनेचं शिवसंकल्प अभियान घेण्यात आलं. शिवसेनेच्या या मेळाव्यातून बोलताना मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली. 'तुम्ही दाढी खेचून खाली आणू म्हणता, पण तुम्ही अडीच वर्षात माडी खाली उतरले नाही, तुम्ही दाढी कशी खेचणार. तुमची गाडी या दाढीनेच खड्ड्यात घातली आहे, विसरू नका. या दाढीकडे खूप नाड्या आहेत, मला बोलायला लावू नका. माझा नाद करू नका, मला हलक्यात घेऊ नका. तुम्ही हलक्यात घेतलं, दोन वर्षांपूर्वी काय झालं ते बघितलं,' असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिला.
advertisement
'हेलिकॉप्टरने गेलो तरी प्रॉब्लेम, चिखल मातीमध्ये गेलो तरी प्रॉब्लेम. कोकणामध्ये नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आणि लगेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या वंदे भारत रेल्वेतून प्रवास केला. एकीकडे टीका करायची आणि दुसरीकडे मोदी गॅरंटीचा लाभार्थी व्हायचं,' असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.
'2019 ला तुम्ही काँग्रेसला मतदान करू नका, काँग्रेसकडे एक तरी पंतप्रधानपदाचा लायक चेहरा आहे का? असं आवाहन केलं होतं, पण आता तुम्ही पलटी मारत आहात. तुम्हाला कार्यकर्त्यांची किंमत कधीच कळाली नाही, त्याबद्दल बोलणं सुद्धा गरजेचं नाही. तुम्ही तुमच्या शरिरातून घामाचा एक थेंब तरी काढलाय का? तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्म झाला असेल तर सर्वसामान्यांची किंमत कळणार नाही,' असा निशाणाही एकनाथ शिंदे यांनी साधला.
'राष्ट्रवादीबाबत निवडणूक आयोगाचा निर्णय तसा आला नसता तर..' ठाकरेंचा खोचक टोला
'अयोध्येत राम मंदिर व्हावं हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं, बाळासाहेब असते तर त्यांनी मोदींचं भरभरून कौतुक केलं असतं. मुंगेरी लाल के सपने पडत आहेत, पंतप्रधानपदाची स्वप्न पडत आहेत. फेसबुक लाईव्ह प्रधानमंत्री व्हा. तुम्ही किती आंदोलनं केलीत, तुमचं योगदान काय? दैव देतं आणि कर्म नेतं ही म्हण खरी आहे,' असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
'26 जुलैच्या पुरात बाळासाहेबांना एकटं सोडून गेलात, बाळासाहेबांची आता आठवण काढून मतं मागू नका. बाळासाहेब असते तर कॅमेरा घे आणि जंगलात जा फोटो काढायला, असं म्हणाले असते. खोट्याच्या कपाळी गोटा ही म्हण खरी करण्याची वेळ आली आहे. शिवसेना चोरली म्हणून रोज बोंब मारता, तुमच्याकडे माणसं नाहीत. बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणारे कोण? काँग्रेसशी हात मिळवणी केलीत, बाळासाहेबांनी उभी केलेली शिवसेना वाचवली, धनुष्यबाण वाचवला. त्याला तुम्ही खड्ड्यात घालण्याचं काम करत होतात, तुम्ही खड्ड्यात जाणार, त्यावर आम्ही माती टाकण्याचं काम करणार नाही. अन्याय सहन करू नका ही बाळासाहेबांची शिकवण आहे,' असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं.
'खोके घेतल्याचा आरोप करता, पण चूक कुणाची याचं आत्मपरीक्षण करा. शिवसेनेचा धनुष्यबाण आपल्या हातात आहे, प्रभू रामाचा बाण आहे त्याने मग्रुरीची मशाल विझवायची आहे. आपल्याला लोकसभेत 45 प्लस जागा निवडून आणायच्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे. मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्याची गॅरंटी आम्ही घेतली आहे. केंद्रात 400 पार तर महाराष्ट्रात 45 पार', असा नारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.