धाराशिव : यूपीएससीची परीक्षा देऊन सनदी अधिकारी व्हावं किंवा भारतीय सैन्य दलात मोठ्या पदावर नोकरीला लागावं ही वडिलांची इच्छा होती, मात्र घरची परिस्थिती हलाखीची असल्यानं अश्विनी भोसलेंनी दुसरी नोकरी स्वीकारली. ही नोकरी काही साधीसुधी नव्हती, तर होती पीएसआय पदाची.
अश्विनी भोसले या यूपीएससी परीक्षेचीच तयारी करत होत्या. त्यादरम्यान त्यांनी एमपीएससीची परीक्षा दिली आणि त्यात पहिल्याच प्रयत्नात त्यांना यश मिळालं. घरची परिस्थिती बेताची असल्यानं मिळालेली चांगली नोकरी त्यांनी स्वीकारली. पीएसआय पदी त्या रुजू झाल्या.
advertisement
अश्विनी या जेलरची परीक्षादेखील उत्तीर्ण झाल्या होत्या, मात्र या पदाला त्यांच्या वडिलांनी तीव्र विरोध केला. परंतु अश्विनी यांनी मुंबईत स्पेशल प्रोटेक्शन युनिटमध्ये यशस्वी काम केलं. आतापर्यंत वरिष्ठांनी दिलेली जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली. आता त्या उमरगा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक म्हणून काम पाहतात.
दरम्यान, हे भोसले कुटुंब मूळ सातारचं, गेल्या अनेक पिढ्यांपासून ते मुंबईत स्थायिक झालं. अश्विनी भोसले यांचे वडील बेस्टमध्ये नोकरीला होते. अश्विनी यांनी खोखो खेळात राष्ट्रीय पातळीवर सहभाग नोंदवला, तर पोलो आणि हॉर्स रायडिंगमध्ये त्या राष्ट्रीय ते आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभागी झाल्या. त्यांच्या पीएसआय होण्याला वडिलांनी विरोध केला होता, मात्र आज अश्विनी भोसले आपल्या मेहनतीच्या जोरावर एक जबाबदार पोलीस अधिकारी म्हणून ओळखल्या जातात.