धाराशिव : हैदराबादच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेक पराक्रमी वीर धारातीर्थी पडले. किसनराव टेके आणि गोदावरी बाई टेके यांचं नाव यात प्रामुख्यानं घ्यावं लागेल. धाराशिव जिल्ह्यातील ईट हे किसनराव टेके यांचं लहानसं गाव. किसनराव हे रझाकारांच्या अत्याचाराविरुद्ध लढत होते. किसनरावांचा 20 वर्षांचा मुलगादेखील रझाकारांच्या अत्याचाराविरुद्ध लढत होता.
रझाकार किसनरावांच्या मागावर होते, एकदा निशस्त्र किसनरावांना रझाकारांनी घेरलं आणि दुरूनच त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात किसनराव ठार झाले, त्यांच्या निधनाची वार्ता गोदावरीबाईंच्या कानावर आली. त्या घरात एकट्याच होत्या, मुलगा कॅंपवर गेला होता, गोदावरीबाईंनी मनाशी निश्चय केला आणि घराचा दरवाजा बंद करून खुंटीवर अडकवलेली पतीची रायफल हाती घेतली. शस्त्राला वंदन केलं. अन्...
advertisement
किसनरावांच्या हत्येनंतर रझाकार त्यांच्या वाड्यावर चालून आले. त्यांनी वाड्याला चारही बाजूंनी घेरलं. वाड्याचे दरवाजे फोडून आत घुसण्यासाठी पुढे सरसावले. तेव्हा हातात रायफल घेऊन उभ्या असलेल्या गोदावरीबाईंनी खिडकीतून नेम धरला...तोच रझाकार धाडकन् खाली कोसळला आणि संपला.
गोदावरीबाईंनी पतीच्या हत्येचा घेतला बदला!
...तेवढ्यात दुसरी गोळी सुटली आणि रझाकार सैरवैर पळी लागले. शेवटी चिडलेल्या रझाकारांनी घर पेटवायचं ठरवलं आणि वाड्याला आग लावली. गोदावरीबाई आत कोंडल्या गेल्या, वाड्यातून धुराचे लोट निघू लागले, एकीकडे वाड्यातून गोळ्या सुटत होत्या आणि दुसरीकडे आग वाढत चालली होती. परंतु जळण्याचं भय गोदावरीबाईंना नव्हतं. अग्नीच्या ज्वाळा जवळ आल्या तरी त्या निर्भयपणे गोळीबार करत होत्या. वाडा सर्व बाजूंनी पेटला, ज्वाळा आकाशात झेपावू लागल्या. आतून होणारा गोळीबारही थांबला! अग्नीने या वीरपत्नीला सामावून घेतलं. त्यांचं हे बलिदान इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलं.