प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत कुणाल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे विकासाचा अभाव असलेले धोरण आहे, असे सांगत त्यांनी हात सोडला. कुणाल पाटील यांच्यासह धुळ्यातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुणाल पाटील यांच्या प्रवेशाचा भाजपला मोठा फायदा होईल. बावनकुळे आणि चव्हाण यांनी कुणाल पाटील यांचे पक्षात स्वागत केले.
advertisement
राजकारणातील भविष्याच्या संधी हेरून पक्षबदल
कुणाल पाटील हे काँग्रेसचे दिवंगत नेते रोहिदास उर्फ दाजीसाहेब पाटील यांचे सुपुत्र... खान्देशच्या विकासाचे स्वप्न पाहिलेले आणि ते सत्यात उतरविण्यासाठी आयुष्यभर धडपडलेले आणि त्याचमुळे गांधी घराण्याचे विश्वासू नेते अशी दाजीसाहेब पाटील यांची ओळख. दाजींनी काँग्रेसशी असलेली नाळ तुटू दिली नाही. कुणाल पाटील यांच्या रूपाने त्यांची तिसरी पिढी काँग्रेसमध्ये आहे. पंडित नेहरू ते राहुल गांधींपर्यंत पाटील घराणे नेहरू-गांधी कुटुंबाशी सदैव एकनिष्ठ राहिले. मात्र त्यांच्या पुढची पिढीने राजकारणातील भविष्याच्या संधी हेरून पक्षबदल करण्याचा निर्णय घेतला.
कोण आहेत कुणाल पाटील?
कुणाल पाटील हे राहुल गांधी यांच्या कोअर टीममधील सदस्य म्हणून ओळखले जात. ते खान्देशचे मोठे नेते आहेत. खान्देश काँग्रेसचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे. त्यांना घरातूनच राजकारणाचे बाळकडू मिळाले. दाजीसाहेबांसारखा मोठा वारसा असल्याने त्यांना सुरुवातीलाच राजकारणात यश मिळाले. काँग्रेस पक्षाकडून महाराष्ट्राच्या तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर ते निवडून गेले होते. मात्र २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. तेव्हापासून ते पक्षात एकटे पडल्याची चर्चा होती. त्याच अस्वस्थतेतून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपला मोठे यश मिळवून देऊ, असा शब्द कुणाल पाटील यांनी भाजप प्रवेश करताना वरिष्ठ नेत्यांना दिला.