धुळे : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील महिर गावातल्या एक 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा संशयितरित्या मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. अज्ञात लोकांनी अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार करून तिची हत्या केला असल्याचा आरोप मयत मुलीच्या कुटुंबीयांसह गावकऱ्यांनी केला आहे. मयत मुलीवर धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येत आहे. आठवड्याभरात अत्याचाराच्या झालेल्या दुसऱ्या घटनेनंतर धुळे हादरले आहे
advertisement
साक्री तालुक्यातील नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावरील इच्छापुर गावाजवळ एक चौदा वर्षीय अल्पवयीन मुलगी अत्यावस्थ अवस्थेत आढळून आली होती. तिला लागलीच रुग्णवाहिकेतून धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र यावेळी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
यात्रेत फिरताना अचानक गायब
मयत मुलगी ही महीर गावाची राहिवासी असून ती इच्छापुर येथे आपल्या बहिणीकडे यात्रेनिमित्त गेली होती. दरम्यान यात्रेत फिरताना अचानक ती गायब झाली. दोन तासांनी संबंधित अल्पवयीन मुलगी जखमी अवस्थेत महामार्गावरील एक हॉटेल जवळ आढळून आली. अज्ञात लोकांनी मारहाण करत तिच्यावर अत्याचार करून महामार्गावर फेकून दिला असल्याचा आरोप महिर गावाचे सरपंच रमेश सरग यांनी केला आहे.
मृतदेह ताब्यात घेणार नाही, गावकऱ्यांचा इशारा
दरम्यान आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. तर या प्रकरणी पोलिसांनी प्रथमता आकस्मात मृत्यू दाखल केली असून शवविच्छेदन अहवालानंतरच मुलीवर अत्याचार झालाय का की तिचा घातपात झाला आहे हे स्पष्ट होणार आहे.
धुळ्यात तरुणीवर सामुहिक अत्याचार
धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. हा अत्याचार दुसरा तिसरा कुणी नव्हे तर इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या मित्राने आणि त्याच्या काही साथीदारांनी केला आहे. आरोपीने पीडितेला लग्नाचं आमिष दाखवून धुळ्याला बोलवलं होतं. ती धुळ्यात येताच आरोपीने आणि त्याच्या मित्रांनी महिलेवर लैंगिक अत्याचार केला आहे. ही सामूहिक अत्याचाराची घटना घडताच पीडित महिलेनं तातडीने धुळे तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी महिलेच्या मुख्य आरोपीसह त्याच्या मित्रांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
