पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरियाणा येथून एका खाद्यतेलाच्या टँकरमधून गुजरातमध्ये विदेशी दारूची तस्करी केली जात असल्याची गुप्त माहिती धुळे पोलिसांना मिळाली होती. ही माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नरडाणा गावाजवळ सापळा रचण्यात आला. इथं संशयित टँकर येताच पोलिसांनी त्याला थांबवून तपासणी केली.
या तपासणीदरम्यान टँकरमधील तस्करीचा प्रकार पाहून पोलिसांना धक्काच बसला. टँकरमधील सहापैकी चार कप्प्यांमध्ये तब्बल ४०० बॉक्स विदेशी दारू आढळून आले. 'पुष्पा' चित्रपटाप्रमाणेच टँकरमध्ये खास कप्पे तयार करून ही दारू लपवण्यात आली होती.
advertisement
पोलिसांनी ही सर्व दारू आणि टँकर जप्त केला असून, या कारवाईत एकूण १ कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही दारू नेमकी कुठे नेली जात होती, याचा पुढील तपास पोलीस करत आहेत. या कारवाईमुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध दारू तस्करीला मोठा धक्का बसला आहे.