शिरपूर विधानसभा मतदारसंघात शिवस्वराज्य यात्रा आली होती. या भागातील लोकांना आता बदल हवा आहे. माणसाने आयुष्यात काहीही बदलावं पण विचार बदलू नये. या मतदारसंघात मोठे नेते आहेत. पण विचार बदलल्यानंतर या भागातल्या लोकांना त्यांची खरी ओळख झाली. ज्या विचारावर आपली प्रगती झाली तो विचार कधी सोडता कामा नये, असे जयंत पाटील म्हणाले.
advertisement
आपली सत्ता जाणार आहे, त्यामुळे शेवटची खेळी खेळायची म्हणून जातीपातीत तेढ निर्माण करून काहीतरी गोंधळ निर्माण करण्याचा सत्ताधाऱ्यांतर्फे करण्यात येत असल्याचा आरोप देखील जयंत पाटील यांनी यावेळी केला आहे. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून महाविकास आघाडीतील सर्वच नेत्यांना बोलण्याचा अधिकार आहे. महाविकास आघाडीत आम्ही एकमेकांवर बंधन घालत नाहीत. मत वेगवेगळी असली तरी देखील आम्ही एकत्र आहोत असे मत जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
जनता सध्याच्या राजवटीवर नाराज आहे
महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार येईल, असं महाराष्ट्रभर वातावरण निर्माण झाले आहे. लोकसभेला आपण सर्वांनी समोरच्या बाजूने सर्व प्रकारांचा अवलंब झाला तरी या मतदारसंघाचे मताधिक्य बरंच खाली आणलं. याचा अर्थ या मतदारसंघातील जनता सध्याच्या राजवटीवर नाराज आहे. आज महाराष्ट्रामध्ये देशांमध्ये सर्वांना भारतीय जनता पक्ष सत्तेतून जावा, असं वाटत आहे. शिरपूर मतदारसंघामधील लोकांच्या मनात भावनाही तीच आहे, असे जयंत पाटील म्हणाले.
आदिवासी समाज कमळ सोडून पाहिजे त्या चिन्हाचे बटण दाबायला तयार
आदिवासी समाजची भारतीय जनता पक्षाला पाठिंबा द्यायची मनस्थिती राहिलेली नाही. महाराष्ट्रातला आदिवासी समाज कमळ सोडून पाहिजे त्या चिन्हाचे बटण दाबायला तयार आहे. या भागातही आदिवासी भागाला सोयीसुविधा मिळालेल्या नाहीत. या भागातील सिंचनाची जबाबदारी आम्ही घेऊ प्रत्येक भागात पाणी नेऊ. कोणाच्याही घशाला कोरड पडणार नाही, यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू, असे आश्वासन जयंत पाटील यांनी दिले.
खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवण्याची वेळ आली आहे
लोकप्रतिनिधी कायम लोकांच्या सेवेत पाहिजे आणि विधानसभेत लोकांचे प्रश्न मांडणारा असला पाहिजे, त्याला आमदार म्हणतात. पण इथले आमदार काय करतात सर्वांनाच माहिती आहे. खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवण्याची वेळ आलीय. महाविकास आघाडी म्हणजे काय तर महाराष्ट्रातील जनतेच्या विकासासाठी केलेले आघाडी, आमच्या ध्यानी मनी केवळ जनतेच काम आणि त्यांचा विकास हेच आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.