शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथे विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन समारंभ पार पडला. या कार्यक्रमात दिलीप वळसे पाटील प्रमुख पाहुणे होते. या कार्यक्रमाला संबोधित करताना मतदारसंघातील लोकांनी आपल्याबरोबर न्याय केला नसल्याचे अप्रत्यक्षपणे वळसे पाटील म्हणाले.
राज्यात माझे वजन कमी झाले आहे
विधानसभेला यावेळी काय झाले, माझे मलाही कळाले नाही. परंतु विधानसभेच्या निकालानंतर राज्यात माझे वजन कमी झाले आहे, अशी खंत वळसे पाटील यांनी बोलून दाखवली. त्याचवेळी गावकऱ्यांनी राष्ट्रवादीच्या तुतारी फुंकणाऱ्या माणसाला किती मतदान केले, याची आकडेवारीही वळसे पाटील यांनी सांगितली.
advertisement
एक रुपयाचं काम केलं नाही त्यांना तुम्ही निवडूनदिलं
तुम्ही जसे मला निवडून दिले तसे कालच्या लोकसभेला अमोल कोल्हे यांनाही निवडून दिले. त्यांनीही बरीच काम केली असतील ना.... असे वळसे पाटील म्हणाले. त्यावर गावातील लोकांनी स्मितहास्य करून कोल्हे यांनी काम केले नसल्याची तक्रार केली. तोच धागा पकडून दिलीप वळसे पाटील यांनी नागरिकांना आरसा दाखवला. अमोल कोल्हे यांनी एक रुपयाचे काम केलेले नसतानाही आढळराव पाटील यांच्यापेक्षा २९१ मते तुम्ही (पिंपरी दुमाला गावाने) अमोल कोल्हे यांना जास्त दिली, असे वळसे पाटील म्हणाले.
दिलीप वळसे पाटील यांना निसटत्या विजयाची बोच, विधानसभेला काय घडलं?
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर दिलीप वळसे पाटील काय भूमिका घेणार याकडे राज्याचे लक्ष लागले होते. दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांचे मानसपुत्र मानले जातात. वळसे पाटील पवारांना सोडून जाणार नाही, असे सगळ्यांनाच वाटत होते. परंतु वळसे पाटलांनी आश्चर्यकारकरित्या अजित पवार यांना साथ देण्याचे ठरवले. शरद पवार यांनीही दिलीप वळसे पाटील यांना जागा दाखवून द्या, अशा आक्रमक शब्दात विधानसभा निवडणुकीला प्रचार केला. आंबेगावमधील पवारांना मानणाऱ्या जनतेने आवाहनाला प्रतिसाद देऊन देवदत्त निकम यांना मतदान केले. चाळीस पन्नास हजारांच्या फरकाने निवडून येणारे वळसे पाटील अगदी हजार-पंधराशे मतांनी निवडून आले. तेव्हापासून त्यांना निसटत्या विजयाची बोच लागून राहिली आहे.
