छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील डॉक्टर अतुल दांडेकर यांनी आपल्या घरामध्ये पर्यावरण पूरक बाप्पाची स्थापना केली आहे. त्यांनी बाप्पासमोर वेरूळ लेणीचा सुंदर देखावा देखील तयार केला आहे. विशेष म्हणजे हा देखावा देखील पर्यावरण पूरक आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्लास्टिक किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वापर केलेला नाही. वेरूळ लेणीचा देखावा उभा करताना डॉक्टर दांडेकर यांनी शाडूची माती, तुळशीच्या मंजुळा, मोहरी, टिश्यू पेपर आणि टूथपिकचा वापर केला आहे. या देखाव्यात पर्यावरणाचं नुकसान होणाऱ्या गोष्टी अजिबात वापरलेल्या नाहीत.
advertisement
Ganeshotsav 2025: मुंबई-पुणे नाही थेट आबु धाबी, कुलकर्णी कुटुंब 10 दिवसांचा बसवतात गणपती!
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात असलेल्या वेरूळ लेण्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलं आहे. या लेण्यांमध्ये हिंदू, बौद्ध आणि जैन धर्माच्या गुहा व मंदिरं आढळतात. कैलास मंदीर हे या लेण्यांमधील सर्वात महत्त्वपूर्ण आणि अद्वितीय रचना आहे. हे मंदिर एकाच अखंड दगडातून कोरलेलं आहे. जग प्रसिद्ध असलेल्या वेरूळ लेणी बघण्यासाठी संपूर्ण जगातून पर्यटक येतात.
डॉक्टर अतुल दांडेकर म्हणाले, "जगप्रसिद्ध ठिकाण असूनही काही लेण्यांची दुरावास्था झालेली आहे. वेरूळ येथील लेण्यांचं संवर्धन आणि जतन करणे, हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. येणाऱ्या पिढ्यांना हा ऐतिहासिक ठेवा माहिती झाला पाहिजे, हा विचार करूनच आम्ही हा देखावा सादर करण्याचं ठरवलं. पर्यावरणपूरक साहित्य वापरून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देखील दिला आहे."