राज्यात मंगळवारी भाजप आणि शिवसेनेमध्ये झालेल्या वादानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी तडकाफडकी दिल्लीत दाखल झाले. राज्यात भाजप आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष वाढलेला असताना शिंदे दिल्लीमध्ये पोहचले. दिल्लीत पोहचल्यानंतर त्यांनी अमित शाहांची निवासस्थानी भेट घेतली. या दोघांमध्ये जवळपास 50 मिनिटे चर्चा झाली. या भेटीत भाजपकडून शिवसेना शिंदे गटाला हतबल करण्याच्या प्रयत्नांसह काही मुद्यांवर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
advertisement
भाजपने अलीकडेच शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात घेतल्यानंतर शिवसेना शिंदे गटामध्ये असंतोषाची लाट पसरली होती. याला प्रतिउत्तर म्हणून शिवसेनेने मित्रपक्षातील नाराज पदाधिकाऱ्यांना गळाला लावण्याची रणनीती आखली होती. २२ तारखेला या पदाधिकाऱ्यांचा मोठा प्रवेश सोहळा आयोजित करण्याची तयारीही झाली होती. मात्र, त्यावर आता थेट ब्रेक लावत उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी सर्व संभाव्य प्रवेश रोखण्याचे आदेश दिले आहेत.
अमित शहा आणि फडणवीस यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रवेश सोहळ्याबाबत शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी गेल्या दोन दिवसांत सविस्तर चर्चा केली. या चर्चेनंतर महायुतीत अनावश्यक तणाव निर्माण होऊ नये म्हणून हे प्रवेश थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला.
शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश दिले. “महायुतीत कोणताही गैरसमज, वितुष्ट किंवा गोंधळ निर्माण होईल असे पाऊल उचलू नका. प्रवेश सोहळे तात्काळ थांबवा, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
स्थानिक राजकारणात उलटफेर!
शिवसेना शिंदे गटात होणारे पक्ष प्रवेश हे ठाणे, रत्नागिरी आणि मराठवाडा, नवी मुंबई, रायगड भागातील होते. मात्र, मित्रपक्षांसह इतर पक्षातून होणाऱ्या पक्ष प्रवेशाला ब्रेक लावण्यात आला आहे. या निर्णयाने आता स्थानिक राजकारणात पुन्हा घडामोडी होणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे.
पक्ष फोडाफोडीवरून आरोप-प्रत्यारोप होत असताना महायुतीमधील वातावरण तापलं होतं. आता एकनाथ शिंदे यांच्या निर्णयानंतर नव्याने होणाऱ्या पक्ष प्रवेशाला ब्रेक लागला आहे.
