सातारा जिल्ह्यातील मुनावळे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे जल पर्यटन प्रकल्प उभारणीचे काम एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मोठा गाजावाजा करत सुरू केले होते. मात्र, या प्रकल्पाला आता ब्रेक लागला आहे. या प्रकल्पासाठी कोणतीही परवानगी न घेता काम सुरू केल्याचा ठपका ठेवत वनमंत्री गणेश नाईक यांनी काम थांबवण्याचे आदेश दिले आहे. हा प्रकल्प एकनाथ शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे म्हटले जाते.
advertisement
ग्रामीण भागात पर्यटन व्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशाने मुनावळे येथे जल पर्यटन प्रकल्प राबिण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मागील वर्षी मार्च महिन्यात उद्घाटन करण्यात आले होते. मात्र, या कामासाठी आवश्यक असणाऱ्या विविध परवानगी घेतली नसल्याचे उघड झाले. त्यामुळे वनमंत्री गणेश नाईक यांनी या प्रकल्पाचे काम थांबवण्याचे आदेश दिले असल्याचे वृत्त एका वृत्तपत्राने दिले आहे.
गणेश नाईकांचे आदेश...
वनमंत्री गणेश नाईक यांच्या निर्देशानंतर मुख्य वनरक्षक यांनी लेखी आदेश काढले आहेत. मुनावळे हे ठिकाण केंद्रीय वन पर्यावरण मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पर्यावरण व जैवविविधतेच्या संरक्षणासाठी 'इकोसेन्सिटिव्ह झोन' म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणतेही पर्यटन प्रकल्प राबवताना वन आणि पर्यावरण विभागाशी संबंधित विविध प्रकारच्या 16 परवानग्या आवश्यक आहेत. मात्र मुनावळे येथील जल पर्यटनाच्या प्रोजेक्टला कोणत्याही विभागाची परवानगी घेण्यात आली नाही.
कोणत्या विभागाच्या हव्यात परवानग्या?
वन पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालय भारत सरकार, केंद्रीय वन्य जीव मंडळ, राज्य वन्य जीव मंडळ, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, कोयना जलसंपदा विभाग, स्थानिक ग्रामपंचायत आदी विविध प्राधिकरणांच्या 16 ना हरकत प्रमाणपत्र परवानगी प्रकल्प सुरू करताना घेतलेल्या नसल्याचे समोर आले आहे.