मुलुंडच्या केळकर महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या १९ वर्षांच्या अर्णव खैरे याला कल्याण लोकलमध्ये चार ते पाच जणांच्या टोळक्याने मारहाण केली. त्यामुळे नैराश्यातून अर्णव लक्ष्मण खैरे (१९) याने जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. अर्णव आपल्या कुटुंबासह कल्याण पूर्वेत तिसगाव नाका येथील सहजीवन सोसायटीत राहत होता. त्याचे पालक बीकेसी येथे नोकरी करतात. ऐन तारुण्यात असताना मुलाने मृत्यूला कवटाळल्याने पालकांवर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.
advertisement
दिवंगत अर्णव खैरेच्या कुटुंबियांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संवाद
कल्याणमधील दिवंगत अर्णव खैरे याच्या कुटुंबियांशी शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शनिवारी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. या प्रकरणात योग्य न्याय मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, तुमच्या दुःखात आम्ही पूर्णपणे सहभागी आहोत असे सांगत खैरे कुटुंबियांना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी धीर दिला. या प्रकरणाचा तातडीने तपास केला जाईल व कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ दिला जाणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी खैरे कुटुंबाला दिले.
अर्णवच्या मृत्यूवरून भाजप शिवसेनेत आरोपांच्या फैरी
अर्णव खैरे ठाकरे बंधुंच्या भाषिक द्वेषाचा बळी असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. त्यांचे संपलेले राजकारण जिवंत करण्यासाठी भाषिक द्वेष पसरवल्याने एका मराठी मुलाचा जीव गेल्याची टीका भाजपने केली. त्यावर भाजपने अर्णवच्या मृत्यूचे राजकारण करू नये, असा पलटवार शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केला.
