ठाण्यात महापौरपदावरून महायुतीतल्या शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगलाय. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना असं समीकरण आहे. 2017मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत एकसंध शिवसेनेने ६७ जागांवर विजय मिळवला तर भाजपला २३ जागांवर विजय मिळवता आला...
मात्र गेल्या आठ वर्षात बरीच राजकीय उलथापालथ झाली. एका शिवसेनेच्या दोन शिवसेना झाल्या. शिवसेनेत ठाण्याची जबाबदारी असलेले एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले होते. सध्या
advertisement
महायुती सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री आहेत. दुसरीकडे ठाणे जिल्ह्यात भाजपची ताकदही वाढलीय. यातूनच महायुतीत स्वबळाचे नारे दिले जाताहेत.
'समोरचे लोक स्वबळाचे नारे देतायत मग असे असताना युती कशासाठी? हा नगरसेवकांचा सूर आहे. जर भाजपने स्वबळावर लढविण्याचे ठरवले तर आम्हीही तयार आहोत. आमचे सैन्य तयार आहे. ३६५ दिवस आम्ही तयार आहोत, असे म्हणत ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी शड्डू ठोकला. तसेच आनंदाश्रमात शिवसेनेच्या माजी नगरसेवकांची बैठकही पार पडली.
ठाण्यातील नेते आपलाच महापौर होणार असा दावा करत असतानाच आणि स्वबळाचे नारे देत असतानाच महायुतीच्या नेते मात्र सबुरीचा सल्ला देताहेत. महायुतीचे नेते योग्य निर्णय घेतील, थोडे सबुरीने घ्यावे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी म्हटले. दुसरीकडे आम्ही तिघे याबाबतचा निर्णय घेऊ, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
ठाण्यात एकीकडे शिवसेना आणि भाजपाकडून स्वबळाचे नारे दिले जात असतानाच अंबरनाथ-बदलापूर नगरपालिके पाठोपाठ आता कल्याण डोंबिवली पालिकेमध्ये सुद्धा शिंदेची शिवसेना आणि भाजप हे एकमेकांविरोधात उभे राहण्याची दाट शक्यता आहे. एकूणच ठाणे जिल्ह्यात शिवसेना आणि भाजप महायुती म्हणून एकत्र लढणार की स्वबळाची ताकद आजमावणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.