पतीच्या स्वप्नांना दिले नवे पंख
प्रियांका यांचे पती निलेश खोत, भारतीय सैन्याच्या सिग्नल्स कॉर्प्समध्ये कार्यरत होते. 2021 मध्ये निलेश यांनी वडिलांना गमावले, आणि त्याच्या अवघ्या दीड महिन्यानंतर, 2022 साली हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे अकाली निधन झाले. या दुहेरी आघाताने खोत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र, या कठीण काळात खचून न जाता प्रियांका यांनी पतीचे सैन्यातील स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सैन्यात दाखल होण्याचा ध्यास घेतला आणि अथक प्रयत्नांनी आपले ध्येय साध्य केले.
advertisement
चेन्नई येथे झालेल्या पासिंग आऊट परेडमध्ये, 25 महिलांसह एकूण 130 ऑफिसर कॅडेट्सनी शॉर्ट सर्व्हिस कमिशनचे प्रशिक्षण पूर्ण केले. हा क्षण केवळ प्रियांका यांच्यासाठीच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबासाठी, कोल्हापूर जिल्ह्यासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद ठरला.
गावाने केले जोरदार स्वागत
लेफ्टनंटपदाची नेमणूक मिळाल्यानंतर प्रियांका आपल्या तारदाळ गावी परतल्या. यावेळी गावकऱ्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. पारंपरिक वाद्यांच्या गजरात गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली, ज्याला सामाजिक सोहळ्याचे स्वरूप आले. "तारदाळचे नाव देशपातळीवर पोहोचवले, हा आमच्यासाठी गौरवाचा क्षण आहे," अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.
यावेळी प्रियांका यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, “आर्मी केवळ नोकरी नाही, तर तो जीवनाचा मार्ग आहे. कुटुंबाच्या खंबीर पाठिंब्यामुळेच मी हे यश मिळवू शकले. पतीचे सहजीवन आणि त्यांचा सततचा पाठिंबा हे माझ्यासाठी प्रेरणास्थान आहे.” त्यांनी तरुण-तरुणींना मोठे स्वप्न पाहण्यासाठी आणि सकारात्मक राहण्यासाठी प्रोत्साहन दिले.
हे ही वाचा : Farm Roads: राज्य शासनाचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांची अनेक वर्षीची मागणी पूर्ण; नेमकं मिळणार तर काय?