निनाद विनय कापुरे असे फसवणूक करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. मेट्रोमोनिअल साईटवरून हाय प्रोफाईल विधवा, घटस्फोटीत महिलांची संपर्क करून लग्नाबाबत चर्चा करायचा. त्यांना विश्वासात घेऊन त्यांची लाखो रुपयांची फसवणूक करायचा. निनाद कापुरेविरुद्ध राज्यात अनेक ठिकाणी फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी फसवणूक झालेल्या दोन महिलांनी पुढे येत जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी निनाद कापुरे याने मेट्रोमोनिअल साईटवर प्रीमियम अकाउंट घेतलं होतं. त्यावर तो तहसीलदार असल्याची खोटी प्रोफाइल टाकून विवाहासाठी हाय प्रोफाईल महिलांशी संपर्क करायचा. यात प्रामुख्याने विधवा, घटस्फोटीत उच्च पदावर असलेल्या महिलांना टार्गेट करायचा. त्यांचा विश्वास संपादन करत त्यांच्याकडून लाखो लुबाडायचा. एवढंच नाही तर तहसीलदार असल्याने नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने देखील तो महिलांची आर्थिक फसवणूक करायचा.
याबाबत राज्यात अनेक ठिकाणी निनाद कापुरे यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जळगाव पोलीस अधीक्षकांकडे तक्रार देणाऱ्या देण्यासाठी आलेल्या एका तरुणीची लग्नाच्या नावाने सात लाखांची तर दुसऱ्या महिलेच्या मुलीला लग्नासह पुण्यातील ससून रुग्णालयात नोकरीला लावून देण्याच्या बहाण्याने आठ लाख रुपयांना लुटलं आहे. दरम्यान फसवणूक झालेल्या महिलांनी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे याबाबत तक्रार केली असून या तक्रारीवर जळगावमध्ये निनाद कापुरे याच्यावर गुन्हा दाखल होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी नागरिकांनी विवाह संकेत स्थळावरील प्रोफाइलवर विश्वास न ठेवता प्रत्यक्ष खात्री करावी, असे आवाहन केले आहे.
