सोमवारी रात्रीच्या सुमारास जेव्हा ३५ प्रवासी गाढ झोपेत होते, तेव्हा काळाने त्यांच्यावर झडप घालण्याचा प्रयत्न केला. बसच्या इंजिनमधून धूर निघू लागला आणि काही क्षणांतच आगीच्या लोळांनी संपूर्ण बसला विळखा घातला. तो काळोख, प्रवाशांच्या किंकाळ्या आणि बाहेर पडण्यासाठी चाललेली धडपड. हा सर्व थरार काळजाचा ठोका चुकवणारा होता. सुदैवाने, चालकाने दाखवलेले प्रसंगावधान आणि प्रवाशांनी मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडण्यासाठी लावलेली जीवाची बाजी यामुळे ३५ जणांचे प्राण थोडक्यात बचावले.
advertisement
हे प्रवासी बसच्या बाहेर पडले आणि अवघ्या काही मिनिटांत डोळ्यांदेखत ती ट्रॅव्हल्स जळून खाक झाली. प्रवाशांचे सामान, कपडे आणि त्यांच्या मेहनतीची पुंजी त्या आगीत भस्मसात झाली.
रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या त्या ३५ प्रवाशांच्या डोळ्यांत मृत्यूला जवळून पाहिल्याची भीती आणि सुखरूप वाचल्याचे अश्रू एकाच वेळी दाटून आले होते. 'काळ आला होता पण वेळ आली नव्हती' याची प्रचिती देणारी ही घटना पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावरील प्रवासाच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करून गेली आहे.
या दुर्घटनेत काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पण, त्या रात्रीच्या आगीच्या ज्वाळा आणि जीवाचा आकांत त्या ३५ प्रवाशांच्या मनातून कधीच पुसला जाणार नाही. घरच्यांना पुन्हा भेटता येईल की नाही, या चिंतेत असलेल्या त्या प्रवाशांसाठी तो अपघात म्हणजे एक पुनर्जन्मच ठरला आहे.
