राष्ट्रपती भवनातील एका शानदार समारंभात पद्म पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय परराष्ट्र मंत्री, एस.जयशंकर तसेच अन्य केंद्रीय मंत्रीगण उपस्थित होते. प्रथम टप्प्यात पार पडलेल्या पद्म पुरस्कार समारंभात राज्यातील पाच मान्यवरांना पुरस्कार आज प्रदान करण्यात आले.
advertisement
आज पार पडलेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या पहिल्या टप्पयात, महाराष्ट्र राज्यातून पाच मान्यवरांना विविध क्षेत्रात त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल गौरविण्यात आले. यात माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांना सार्वजनिक सेवा क्षेत्रात, दत्तात्रय अंबादास मायाळू उर्फ राजदत्त यांना कला क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी ‘पद्मभूषण पुरस्कार’ तर डॉ. मनोहर कृष्ण डोळे यांना औषधी, डॉ. जहीर इसहाक काझी यांना साहित्य व शिक्षण क्षेत्रात तर कल्पना मोरपारिया यांना व्यापार व उद्योग क्षेत्रात दिलेल्या उत्कृष्ट योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले.
महाराष्ट्रातील पद्पुरस्कार प्राप्त मान्यवरांविषयी
राम नाईक- माजी केंद्रीय मंत्री राहिलेले राम नाईक यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राम नाईक यांनी वयाच्या 35 व्या वर्षी नोकरी सोडली आणि त्यानंतर ते राजकारणात गेले. खासदार व केंद्रीय मंत्री व राज्यपाल अशी पदे त्यांनी भुषविली असून, 1989, 1991, 1996, 1998 व 1999 लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र राज्यातील उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्यांनी उत्तर प्रदेश राज्याचे राज्यपाल पदही भुषविले आहे. त्यांच्या अथक प्रत्यनांमुळे उत्तर प्रदेशला स्थापनेनंतर 68 वर्षांनी उत्तर प्रदेश दिवस साजरा करण्यास मिळाला.
राजदत्त – श्री दत्तात्रय अंबादास मायाळू उर्फ राजदत्त या नावाने प्रख्यात असलेले राजदत्त यांना त्यांनी दिलेल्या कला क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करणत आले. त्यांच्या चित्रपटसृष्टीतील 50 वर्षांपेक्षा जास्त कामगिरीचा हा मोठा सन्मान आहे. राजदत्त यांनी आजवर तीन वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, राज्य शासनाकडून सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे प्रथम पुरस्कार 8 वेळा, 3 द्वितीय आणि 2 तृतीय असे तब्बल 13 राज्य चित्रपट पुरस्कार पटकावले आहेत. राजदत्त यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘मधुचंद्र’ या पहिल्याच चित्रपटाला त्यांना उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता. यासोबतच ‘राघूमैना’, ‘देवकीनंदन गोपाला’, ‘माझं घर माझा संसार’, ‘शापित’, ‘पुढचं पाऊल’, ‘हेच माझं माहेर’, ‘अरे संसार संसार, ‘मुंबईचा फौजदार’ या सुपरहिट सिनेमांचं दिग्दर्शन केले आहे. 92 वर्षांच्या राजदत्त यांनी चित्रपटसृष्टीत 50 वर्षांपेक्षा अधिक वर्षांचे योगदान आहे.
वाचा - भाजपच्या मिशन 400 चा शुभारंभ, 4 जूनच्या निकालाआधीच पहिला उमेदवार जिंकला
डॉ. जहीर इसहाक काझी – डॉ. झहीर काझी यांना त्यांनी साहित्य व शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने आज गौरविण्यात आले. गेल्या 40 वर्षांपासून ते शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत, ज्यात 150 वर्षे जुन्या अंजुमन-इ-इस्लामचे प्रमुख म्हणून 13 वर्षांचा समावेश आहे, ज्यात सुमारे 97 शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे, अनाथाश्रम आणि इतर शैक्षणिक संस्थेमार्फत चालतात. नवीन पनवेल येथे 10.5 एकर जागेवर पसरलेल्या अभियांत्रिकी, आर्किटेक्चर आणि फार्मसी आणि पॉलिटेक्निकमध्ये डिप्लोमा, पदवी आणि पदव्युत्तर कार्यक्रम देणारे एकात्मिक तांत्रिक कॅम्पस तसेच विधी महाविद्यालयाची स्थापना करण्याचे श्रेय त्यांना मिळाले आहे. त्यांनी गोवा मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस आणि शहरातील नायर हॉस्पिटलमधून एमडी (रेडिओलॉजी) केले. सराव करणारे रेडिओलॉजिस्ट, काझी हे नागपाडा येथील प्राइम डायग्नोस्टिक सेंटरचे संचालक आहेत. त्यांनी यापूर्वी व्यवस्थापन प्रतिनिधी म्हणून मुंबई विद्यापीठ सिनेटचे सदस्य म्हणून काम केले आहे. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वेळा शिक्षण अल्पसंख्याक संघाच्या समस्या आणि धोरणांवर चर्चा करण्यासाठी आणि जॉर्डनच्या राजाच्या भेटीदरम्यान आमंत्रित केले आहे.
कल्पना मोरपरिया - श्रीमती कल्पना मोरपारिया यांनी व्यापार व उद्योग क्षेत्रात दिलेल्या उत्कृष्ट योगदानासाठी आज पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. श्रीमती कल्पना मोरपरिया या एक भारतीय बँकर आहेत. आयसीआयसीआय बँकेत त्यांनी दीर्घ सेवा दिली असून,सध्या त्या जेपी मॉर्गन इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांनी अनेक आघाडीच्या भारतीय कंपन्यांच्या संचालक मंडळावर स्वतंत्र संचालक म्हणून काम केले आहे. ते बॉम्बे विद्यापीठातून कायद्याचे पदवीधर आहेत आणि त्यांनी भारत सरकारने स्थापन केलेल्या अनेक समित्यांवर काम केले आहे. फॉर्च्युन मासिकाने आंतरराष्ट्रीय व्यवसायातील पन्नास सर्वात शक्तिशाली महिलांपैकी एक म्हणून त्यांनी स्थान मिळविले आहे.
डॉ मनोहर कृष्ण डोळे – औषधी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत आज डॉ डोळे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ डोळे हे धर्मादाय नेत्र रुग्णालय चालवतात, त्याची स्थापना 1982 मध्ये झाली. पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यातील विविध भागात दर महिन्याला 10 ते 12 मोफत नेत्रशिबिरांचे आयोजन करतात. वर्षानुवर्षे, त्यांच्याद्वारे चालवलेले फाउंडेशनमार्फत, नारायणगाव, पुणे आणि आसपासच्या वंचित ग्रामीण तसेव आदिवासी लोकांना नेत्रसेवा पुरवत .असतात. नेत्र तपासणी शिबिरांच्या माध्यमातून त्यांनी विनामूल्य नेत्रसेवा देत अमूल्य योगदान दिले आहे.
देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये प्रदान केले जातात. कला, सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यक, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा इत्यादी विविध शाखा/कार्यक्रमांमध्ये हे पुरस्कार दिले जातात. असामान्य आणि विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मविभूषण’ दिला जातो; उच्च श्रेणीतील विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मभूषण’ आणि कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने या पुरस्कारांची घोषणा केली जाते.
हे पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते दरवर्षी मार्च / एप्रिलच्या सुमारास राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात प्रदान केले जातात. वर्ष 2024 साठी, राष्ट्रपतींनी 132 पद्म पुरस्कार प्रदान करायला मान्यता दिली असून, यामध्ये 5 पद्मविभूषण, 17 पद्मभूषण आणि 110 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये 30 महिला आहेत आणि या यादीत परदेशी/एनआरआय/पीआयओ/ओसीआय या श्रेणीतील 8 मान्यवर आणि 9 मरणोत्तर पुरस्कारप्राप्त मान्यवरांचाही समावेश आहे.