मुंबई : पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जे याला पत्नी गौरी गर्जेच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. वरळीतील राहत्या घरी गौरी गर्जे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. गौरीची आत्महत्या नाही हत्या असल्याचा आरोप कुटुंबियांकडून करण्यात येत आहे. दरम्यान गर्जे यांच्या अहिल्यानगरच्या मूळ घराजवळ गौरीचे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. गौरीच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदाच त्यांच्या वरळीत घराशेजारी राहणाऱ्या त्या दिवशी काय घडलं याविषयी सांगितले आहे.
advertisement
अंत्यसंस्कारांच्या वेळी डॉ. गौरी गर्जे यांच्या वडिलांचा हा आक्रोश काळीज चिरणारा आहे. मुलीच्या सुखासाठी चांगलं स्थळ पाहिलं, मुंबईला राहणारा, चांगला कमावणारा, चांगल्या घरातला मुलाशी विवाह लावून दिला. पण लग्नाच्या अवघ्या 9 महिन्यातच त्यांना मुलीच्या पार्थिवाला अग्नी देण्याची वेळ आली आहे. पतीच्या अनैतिक संबंधांमुळे गौरीचा जीव गेल्याचा आरोप पालवे कुटुंबियांनी केलाय. त्यामुळे संतप्त झालेल्या गौरीच्या कुटुंबानं अनंत गर्जेच्या अहिल्यानगर येथील मूळ गावातील घरासमोर तिचा अंत्यसंस्कार केला.आधी वाद मग बाचाबाचीनंतर पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर हे अंत्यसंस्कार करण्यात आहे.
गौरीच्या आत्महत्येनंतर शेजाऱ्यांनी घरात काय पाहिले?
गौरी आणि अनंतचे शेजारी म्हणाले, दोन महिन्यापूर्वी गौरी आणि अनंत आमच्या घराशेजारी राहायला आले होते. गौरी आणि अनंत यांच्यात भांडण झालं असलं तरी आम्हाला ते कधी ऐकू आलं नाही. दोघे ही नोकरी करायचे त्यामुळे फक्त्त संध्याकाळी घरी यायचे. आमचं दरवाजा अनेकदा उघडा असल्याने ते येताजाता ते आम्हाला दिसायचे. गणपतीनंतर ते आमच्या इथे राहायला आले होते. मात्र त्यांचा मजल्यावर कोणाशी जास्त संवाद नव्हता. ज्या दिवशी गौरीने आत्महत्या केली तेव्हा अनंतने दोनदा आम्हाला हाक दिली, आम्ही ज्यावेळी पोहोचले तेव्हा गौरी खाली होती . त्यानंतर अनंतने कुणालातरी फोन करून बोलावून घेतलं आणि गौरीला चादरीत गुंडाळले आणि रुग्णालयात घेऊन गेला.
आत्महत्येआधी गौरी आणि अनंतचे कडाक्याचं भांडण
केईएम हॉस्पिटलमध्ये डेंन्टिस्ट असलेली गौरी हिमतीची होती.आत्महत्या करणाऱ्यातली नव्हती असं सांगत तिच्या कुटुंबानं गौरीच्या हत्येचा संशय व्यक्त केला आहे. गळफास घेतलेल्या गौरीला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर तिचा पती अनंत गर्जे फरार होता. रविवारी रात्री उशिरा तो पोलिसांना शरण गेला. रात्री 1 वाजता वरळी पोलिसांनी अनंत गर्जेला अटक केली. आत्महत्येआधी गौरी आणि अनंतचे कडाक्याचं भांडण झाल्याची माहिती अनंतनं पोलीस जबाबात दिली आहे.
पोलीस जबाबात काय अनंतने काय म्हटलंय?
आत्महत्येच्या काही मिनिटांपूर्वीच गौरी आणि अनंत यांचं भांडण झालं होतं. यानंतर अनंत पंकजा मुंडे यांच्या कार्यक्रमानिमित्त घराबाहेर पडला. अनंतची कार कोस्टल रोडला असताना त्यानं वारंवार गौरीला फोन केला...मात्र गौरीनं फोन उचलला नाही. अनंतनं कार पुन्हा घराकडे वळवली. घराबाहेरून आवाज देऊनही गौरी दार उघडत नव्हती. आतून कुठलीही प्रतिक्रिया मिळत नसल्यानं अनंतनं खिडकीतून घरात डोकावलं. यावेळी गौरीनं गळफास घेतल्याचं दिसून आलं.
फॉरेन्सिक पथक गर्जेच्या घरी
गौरीच्या आत्महत्येप्रकरणी अनंत गर्जेसह त्याची बहिणी शीतल गर्जे-आंधळे आणि दीर अजय गर्जे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणातील पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक पथक आणि डॉक्टरांच्या पथकानं अनंत गर्जेच्या मुंबईतील घराची तपासणी केली. अनंत गर्जे यानं रडत रडत गौरीच्या आत्महत्येबाबत पंकजा मुंडेंना कळवलं होतं, असं पंकजा यांनी आपल्या निवेदनात म्हटलंय. यावर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सवाल उपस्थित केले आहेत.
सामाजिक आणि वैद्यकिय क्षेत्रातही खळबळ
गौरी गर्जेच्या आत्महत्येनं राज्यातील सामाजिक आणि वैद्यकिय क्षेत्रातही खळबळ उडालीय गौरीच्या पतीला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस तपासात आणखी काही बाबी उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
