पुणे, मुंबई, सांगली, कोल्हापूर, पालघर यासह अनेक जिल्ह्यात जीबीएसचा शिरकाव झाला आहे. या जिल्ह्यात हळूहळू रुग्णसंख्या आता वाढत चालली आहे. त्याचसोबत जीबीएस बाधित मृतांची संख्या देखील वाढत आहेत. अशात आता सांगली जिल्ह्यातील मिरजेतील शासकीय रुग्णालयात जीबीएस बाधित दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील एक मृत रुग्ण हा सोलापूरचा होता. त्यामुळे या दोन जिल्ह्यात आता पुणे, मुंबईनंतर जीबीएस बाधित रूग्णांचे मृत्यू होतायत.
advertisement
जीबीएस या आजाराची लागण झालेल्या दोन रुग्णांचा मिरजेतील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला आहे. यातील एक रूग्ण 14 वर्षाचा मुलगा होता, जो कर्नाटकातील हुक्केरी येथून सांगलीत उपचारासाठी आला होता. तर दुसरी रुग्ण ही 60 वर्षीय महिला होती, जी सोलापूरच्या सांगोला जिल्ह्यातून आली होती.
कर्नाटकातील हुक्केरी येथील 14 वर्षांच्या मुलाला 'जीबीएस'ची लागण झाली होती. या मुलाला 31 जानेवारी रोजी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे त्याच्यावर साधारण दोन आठवडे उपचार करण्यात आले. पण रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.दुसरी रुग्ण महिला शासकीय रुग्णालयात गुरुवारी दुपारी दाखल झाली होती. ही महिला सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील रहिवासी होती.तिचा मध्यरात्री मृत्यू झाला आहे.
मिरजेतील शासकीय रुग्णालयात गेल्या 15 दिवसांत जिल्हा व जिल्ह्याबाहेरील 15 रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यापैकी ६ रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या रुग्णालयात 7 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एक रुग्ण पुण्याला, तर एक कराडला उपचारासाठी गेला आहे. 15 रुग्णांमध्ये सांगली शहरातील ३ रुग्णांचा समावेश आहे. शहरात चिंतामणीनगर, विश्रामबाग आणि संजयनगरमध्ये 'जीबीएस'चे रुग्ण आढळले होते. तसेच नागरिकांनी घाबरून जाऊ नये. उपचारानंतर रुग्ण पूर्णपणे बरे होतायत त्यामुळ लक्षणे दिसल्यास तातडीने उपचार घ्यावेत, असे आवाहन मिरज शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांनी केले आहे.
दरम्यान महाराष्ट्रात जीबीएस बाधित संशयित रूग्णांची संख्या आता 207 वर पोहोचली आहे, असे राज्य आरोग्य अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले. या रुग्णांमध्ये 180 जणांना जीबीएसची लागण झाली आहे. ज्यापैकी २० रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.तर मृतांची संख्या आठ असली तरी, सोलापूरात जीबीएसशी संबंधित एका संशयास्पद मृत्यूची नोंद झाली आहे.
