घोडबंदर मार्गावरील प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी प्रताप सरनाईक यांनी ठाणे महापालिकेत महत्वाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला एमएमआरडीएचे अधिकारी आणि ठाणे महापालिकेचे अधिकारी देखील उपस्थित होते. घोडबंदर रोडवरील कामं पूर्ण होईपर्यंत या मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक रात्री 12 ते पहाटे 6 पर्यंत बंद करण्यात घालण्यात यावी. सकाळी अवजड वाहनं भिवंडी मार्गाने वळवण्यात यावीत, असे आदेश सरनाईक यांनी वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाठ यांना दिले आहेत.
advertisement
ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पालघर आणि गुजरात भागातील वाहतुकीसाठी घोडबंदर मार्ग महत्वाचा मानला जातो. या मार्गावरून अवजड वाहनांसह स्थानिक नागरिक देखील प्रवास करतात. या मार्गावर मुख्य आणि सेवा रस्ता जोडणी तसेच मेट्रो प्रकल्पाची कामं एकाच वेळी सुरू असल्याने मार्ग अरुंद झाला आहे. परिणामी रोज वाहतूक कोंडी होत आहे. गायमुख रस्त्याची दुरावस्था व डोंगर भागातून येणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. या कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत.
महापालिका अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत सरनाईक यांनी विकासकामांची लवकरात लवकर पूर्तता करून उद्घाटनाच्या तारखा निश्चित करण्याचे निर्देश दिले. याच बैठकीत मोघरपाडा येथील कांदळवन उद्यान, कासारवडवली तलावाचे सुशोभीकरण, जुन्या उद्यांनाचे नवीनीकरण, या कामांचा आढावा सरनाईक यांनी घेतला. शिवाय, नांगला बंदर खाडी किनारा विकसित करताना त्या जमिनीवर जास्तीत जास्त वृक्षारोपण करून वनराई क्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्न केले जावेत, अशा सूचनाही दिल्या.
