गुलशन कुमार यांच्यावर झाडल्या होत्या १६ गोळ्या
१२ ऑगस्ट १९९७ रोजी मुंबईतील अंधेरी येथील जीतनगर भागात असलेल्या शिवमंदिरातून बाहेर पडत असताना गुलशन कुमार यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमचा हस्तक असलेल्या अब्दुल रऊफ मर्चंटने अतिशय जवळून गुलशन कुमार यांच्यावर तब्बल १६ गोळ्या झाडल्या होत्या. या भीषण हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या गुन्ह्यात मर्चंट मुख्य हल्लेखोर असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर २००२ मध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. २००३ मध्ये त्याची रवानगी छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल कारागृहात करण्यात आली होती.
advertisement
पॅरोलवर बाहेर पडला आणि ८ वर्षे फरार झाला
अब्दुल मर्चंट याची २००९ मध्ये पॅरोलवर सुटका करण्यात आली होती. तुरुंगातून बाहेर पडताच त्याने पोलिसांना गुंगारा देऊन पलायन केले. तब्बल आठ वर्षे तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार होता. अखेर २०१६-१७ मध्ये पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला पुन्हा अटक केली आणि त्याची रवानगी पुन्हा हर्सूल कारागृहात करण्यात आली होती.
एकदा मृत्यूला चकवलं, पण चौथ्या दिवशी अंत
गेल्या काही दिवसांपासून मर्चंटची प्रकृती खालावली होती. ३० डिसेंबर रोजी त्याला सौम्य हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर तातडीने त्याला शासकीय घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा झाल्याचं पाहून ४ जानेवारी रोजी त्याला पुन्हा कारागृहात हलवण्यात आले. मात्र, गुरुवारी सकाळी त्याला पुन्हा हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.
