मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण विषय आंदोलनाने मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईतील अनेक रस्त्यांवर वाहने अडवल्याने वाहतूक कोंडी होत आहे. तसेच मराठा आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज स्टेशन परिसरात जोरदार गर्दी केल्याने मुंबईकरांना प्रवास करणे जिकीरीचे झाले आहे. सोमवारी आंदोलनाचा चौथा दिवस आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय आझाद मैदानातून उठणार नाही, असा ठाम निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केल्याने गावखेड्यातून मराठा बांधव मोठ्या संख्येने मुंबईकडे निघाले आहे. अशा सगळ्या परिस्थितीत एमी फाऊंडेशनने दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीत मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने वकिलांनी, राज्य सरकारच्या वतीने राज्याचे महाअधिवक्ता बिरेंद्र सराफ आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांनी युक्तिवाद केला. मुंबईकरांचे होत असलेले हाल न्यायालयाने अतिशय गंभीरपणे घेत सरकारने तत्काळ पावले उचलावीत, असे निर्देश दिले.
advertisement
राज्यात मराठा मुख्यमंत्री नसल्याने हे आंदोलन उभे राहिले
ठाकरेंची शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाकडून आरक्षण आंदोलनाचे अतिशय घाणेरड्या पद्धतीचे राजकारण सुरू आहे. दोन्ही पक्ष जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. दिल्लीतील शाहिनबाग प्रमाणे फंड कोण पुरवतंय हे न्यायालयाने तपासावे, असे सदावर्ते म्हणाले. तसेच मागील वेळी आम्ही हस्तक्षेप केल्यानेच जरांगे पाटील यांना वाशीत रोखल्याकडे सदावर्ते यांनी लक्ष वेधले आहे. दुसरीकडे राज्यात मराठा मुख्यमंत्री नसल्याने हे आंदोलन उभे राहिले आहे, असेही सदावर्ते म्हणाले.