दक्षिण भारतात, विशेषत: तामिळनाडू आणि आसपासच्या प्रदेशात ५ नोव्हेंबरपासून ते ८ नोव्हेंबरपर्यंत जोरदार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. या भागातून दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरापासून उत्तर केरळपर्यंत पसरलेला निम्न दाब पट्टा जात आहे. या पट्ट्यामुळे, तसेच सध्या सक्रिय असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे, तामिळनाडूमध्ये या काळात ७ ते ११ सेंटीमीटर इतक्या अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
advertisement
उत्तर-पश्चिम भारतात गारठ्यात वाढ
दरम्यान, उत्तरेकडील हवामानातही बदल दिसून येत आहेत. उत्तर पाकिस्तान आणि त्याला लागून असलेल्या भागांवर सक्रिय असलेला पश्चिम विक्षोभ आता पुढे सरकत आहे. तो आज उत्तर पंजाब आणि त्याच्या शेजारील भागांमध्ये सायक्लोनिक सर्क्युलेशनची स्थिती निर्माण झाली आहे. हे जसं जसं पुढे जाईल तसतसा उत्तर-पश्चिम दिशेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव वाढेल.
या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे पुढील तीन दिवसांत उत्तर-पश्चिम भारतातील आणि मध्य भारतातील किमान तापमानात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे. उत्तर-पश्चिम भारतात हे तापमान ३ ते ५ अंश सेल्सिअसने कमी होऊ शकते, तर मध्य भारतात २ ते ४ अंश सेल्सिअसने घट अपेक्षित आहे. त्यानंतर तापमानात मोठा बदल होणार नाही. म्हणजेच, आता हळूहळू उत्तरेकडील अनेक भागांमध्ये थंडीचा कडाका वाढताना दिसेल.
आजपासून पावसाचा जोर कमी होणार आहे. महाराष्ट्रात हलक्या स्वरुपाचा पाऊस राहणार आहे. तर 7 नोव्हेंबरपासून तापमानात घट होण्याची शक्यता आहे. गुलाबी थंडी अनुभवायला मिळू शकते. विकेण्डला मुंबई उपनगर, नवी मुंबई, रायगडसह विदर्भ, मराठवाड्यात तापमान घसरण्याची शक्यता आहे. तापमानात हळूहळू घट होणार आहे. पाऊस आणि दमट वातावरणामुळे वैतागलेल्या नागरिकांना आता गुलाबी थंडीची मजा घेता येणार आहे.
