या निर्णयामुळे तृतीयपंथीय समाजाला केवळ रोजगाराची संधी मिळणार नाही तर त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्याचा मार्गही खुला झाला आहे. या दुकानाच्या माध्यमातून समाजातील या घटकाचा आत्मसन्मान वाढविण्यास हातभार लागेल, अशी भावना मैत्री संघटनेच्या सदस्यांनी व्यक्त केली.
राज्य तृतीयपंथीय कल्याणकारी मंडळाच्या सदस्य मयुरी आळवेकर यांनी सांगितले की, हे रेशन दुकान फक्त रोजगाराचे साधन नाही, तर तृतीयपंथीय समाजाच्या मुख्य प्रवाहात समावेशाचे प्रतीक आहे. शासनाने घेतलेले हे पाऊल ऐतिहासिक असून समाजातील बदलाचा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
advertisement
शनिवारी कोल्हापूरमधील महासैनिक दरबार हॉल येथे झालेल्या राज्यस्तरीय रोजगार मेळाव्यात हा निर्णय औपचारिकरित्या घोषित करण्यात आला. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत अन्नधान्य पुरवठा विभागामार्फत मैत्री संघटनेला रेशन दुकान चालविण्याचे अधिकृत पत्र सुपूर्द करण्यात आले.
या उपक्रमामागे गेल्या चार वर्षांपासून चालत असलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा आहे. संघटनेने तृतीयपंथी समाजाच्या सदस्यांना रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्यासाठी प्रशासनाशी अनेक वेळा संवाद साधला होता. अखेर अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने हा निर्णय प्रत्यक्षात आला.
मैत्री संघटनेने यापूर्वीही समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी विविध उपक्रम राबविले आहेत. शिक्षण, आरोग्य, स्वावलंबन आणि रोजगार या क्षेत्रांत त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे राज्यस्तरावर कौतुक झाले आहे. या पार्श्वभूमीवर रेशन दुकान चालविण्याची जबाबदारी मिळाल्याने संघटनेच्या कार्यात आणखी बळ येणार आहे.
या उपक्रमामुळे तृतीयपंथी समाजातील सदस्यांना रोजगार मिळेलच पण त्याचबरोबर नागरिकांशी थेट संवाद साधण्याची आणि समाजात आपली सकारात्मक भूमिका सिद्ध करण्याची संधीही मिळेल. रेशन दुकानाद्वारे तृतीयपंथीय समुदाय लोकांच्या दैनंदिन जीवनाशी जोडला जाईल हे त्यांच्या सामाजिक समावेशाच्या दिशेने मोठे पाऊल ठरेल.
राज्य शासनाच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. सामाजिक समतेचा आणि मानवतेचा संदेश देणारा हा निर्णय अन्य जिल्ह्यांसाठी आदर्श ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तृतीयपंथीयांना स्वावलंबी बनविण्याच्या दिशेने कोल्हापूर जिल्ह्याने घेतलेले हे पाऊल निश्चितच इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी कोरले जाईल.