पश्चिम महाराष्ट्र आणि कोंकणात विजांचा कडकडाट
हवामान तज्ज्ञ उमाशंकरदास यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागच्या 24 तासांत सौराष्ट्र, कच्छ, कोंकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. नवी मुंबई, रायगड, मुंबई आणि उपनगरातही मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. अरबी समुद्रात तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र आता उत्तर-उत्तरपूर्व दिशेकडे सरकत असून, पुढील 24 तासांत ते कमजोर होण्याचा अंदाज आहे. तरीदेखील या प्रणालीचा परिणाम महाराष्ट्रावर दिसू शकतो. हवामान खात्यानुसार, ३ आणि ४ नोव्हेंबर रोजी विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता कायम आहे.
advertisement
4 नोव्हेंबरपासून उत्तर भारतात बर्फवृष्टी, महाराष्ट्रात पाऊस
4 नोव्हेंबरला हिमाचल, जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंडात बर्फवृष्टी होण्याची शक्यता असून, याच काळात मध्य भारतात पावसाचा प्रभाव कायम राहील. महाराष्ट्रात विशेषतः मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात गडगडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. तसेच तटीय आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि रायलसीमा भागातही ढगाळ वातावरण आणि वीजांसह पाऊस पडू शकतो.
तापमानात घट होणार, हवेत गारवा वाढणार
हवामान तज्ज्ञ उमाशंकरदास यांनी दिलेल्या माहितीनुसार हवामान खात्याच्या माहितीनुसार, सध्या देशाच्या मध्य भागात तापमान सामान्यपेक्षा जास्त आहे. मात्र, पुढील तीन ते चार दिवसांत तापमानात 3 ते 5 अंश सेल्सिअसपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातही 4 नोव्हेंबरनंतर रात्रीच्या तापमानात गारवा जाणवेल. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात तापमानात दोन ते तीन अंशांची घट नोंदवली जाऊ शकते.
6 नोव्हेंबरनंतर स्थिरता, पण थंडीचा अंदाज
6 नोव्हेंबरनंतर बहुतेक भागांत हवामान स्थिर होईल, मात्र दक्षिण भारतातील काही राज्यांबरोबर महाराष्ट्राच्या काही भागांत ढगाळ वातावरण राहू शकतं. दरम्यान, पश्चिम विक्षोभाचा प्रभाव ओसरल्यानंतर देशाच्या उत्तरेकडील आणि पश्चिमेकडील भागात तापमानात लक्षणीय घट होऊन थंडीची चाहूल लागेल, असं हवामान खात्यानं स्पष्ट केलं आहे.
मागच्या 24 तासात पावसानं नुकसान
पालघर जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून पावसाने थैमान घातलं आहे. त्यामुळे भात शेतीचं मोठं नुकसान झालंय.. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतलाय त्यामुळे भात उत्पादक शेतकरी हवालदिल झाला. नांदेड शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला.. अर्धापूर , मुदखेड , धर्माबाद , हदगाव, हिमायतनगर आणि भोकर तालुक्यात जोरदार पाऊस झाला त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जालनाच्या पारध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. अवकाळी पावसामुळे मका पिकाचं नुकसान झालंय. यामुळे शेतकरी आर्थिक चिंतेत सापडला आहे. तातडीनं पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.
