संजीवराजे नाईक निंबाळकर हे अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये घरवापसी करणार असल्याचे वृत्त होते. त्यातच आयकर विभागाने त्यांच्यावर छापा मारल्याने चर्चांना उधाण आले होते. संजीवराजे निंबाळकर यांची आज देखील चौकशी सुरूच आहे. पुण्यात आज सलग दुसऱ्या दिवशी संजीवराजे निंबाळकर यांच्या घरी इनकम टॅक्स अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावर आणि गोविंद दूध डेअरी बाबत चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. एकाचवेळी पुणे, फलटण येथील निवासस्थानी ही छापेमारी करण्यात आली. विविध ठिकाणचे आर्थिक व्यवहार याबाबतची चौकशी अधिकाऱ्यांकडून सुरू आहे
advertisement
फलटणमध्ये 17 तास झाडाझडती...
फलटण येथे काल आयकर विभागाकडून संजीवराजे नाईक निंबाळकर यांची 17 तास चौकशी झाल्याची माहिती आहे. रात्री उशिरा बारा वाजण्याच्या सुमारास आयकर विभागाचे कर्मचारी संजीवराजे यांच्या बंगल्यातून बाहेर पडले. चौकशीनंतर संजीवराजे यांनी घराबाहेर येऊन कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. संजीवराजे यांनी प्रसारमाध्यमांना आयकर विभागाच्या कारवाईबाबत माहिती देण्याचे टाळले. संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी अजूनही पोलिसांचा बंदोबस्त आहे.
संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्याशिवाय रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावरही आयकर विभागाने धाड टाकली. संजीवराजे आणि रघुनाथराजे हे दोघेही रामराजे निंबाळकर यांचे चुलत बंधू आहेत. रघुनाथराजे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत.
