संगमनेर, 23 नोव्हेंबर : अपत्यप्राप्तीबद्दल केलल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी इंदोरीकर महाराजांना मोठा दिला मिळाला आहे. संगमनेर न्यायालयाकडून इंदोरीकर महाराजांना जामीन मंजूर झाला आहे. पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत इंदोरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. इंदोरीकर महाराजांनी सुनावणीच्या एक दिवस आधीच स्वत: कोर्टात हजर राहून जामीन घेतला.
24 नोव्हेंबरला इंदोरीकर महाराजांच्या जामीन अर्जावर सुनावणी होती, पण यादिवशी इतर जिल्ह्यात नियोजित कीर्तन असल्यामुळे इंदोरीकर महाराजांनी कोर्टाला विनंती केली होती. ही विनंती मान्य करत कोर्टाने इंदोरीकरांना जामीन मंजूर केला. 20 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर इंदोरीकर महाराजांचा जामीन मंजूर करण्यात आला. इंदोरीकर महाराजांचे वकील अॅड.के.डी धुमाळ यांनी ही माहिती दिली.
advertisement
काय आहे प्रकरण?
इंदोरीकर महाराजांनी 2020 साली एका किर्तनात अपत्यप्राप्तीबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. २०२० साली दाखल झालेल्या गुन्ह्यात जिल्हा न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. पण अंधश्रद्धा निर्मूलन समीती आणि राज्य सरकारने या निर्णयाला आव्हान देत हायकोर्टात धाव घेतली. हायकोर्टाने हा खटला जिल्हा न्यायालयात पुन्हा चालवण्याचा आदेश दिला होता. तोच आदेश सुप्रिम कोर्टानेही कायम ठेवल्याने इंदोरीकर महाराजां विरोधात संगमनेर कोर्टात हा खटला नव्याने सुरू झाला.
गेल्या महिन्यात कोर्टाने समन्स बजावले होते. मात्र इंदोरीकर महाराज भेटले नाही असा रिपोर्ट पोलिसांकडून कोर्टात सादर करण्यात आला होता.
