राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी अंजना कृष्णा यांच्या अंगावर वर्दी नाही तसेच त्या खासगी गाडीतून आल्याचे सांगत त्यांचे वर्तन उद्दामपणाचे होते, असे म्हणत अजित पवार यांच्याप्रति आपली निष्ठा दाखविण्याचा प्रयत्न केला. कुर्डू गावात जाऊन तेथील पक्षाच्या कार्यकर्त्यांची चर्चा करून त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या संपूर्ण पत्रकार परिषदेत आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा कशा चुकीच्या वागल्या, हेच दाखविण्याचा प्रयत्न उमेश पाटील यांनी केला. दुसरीकडे आमदार अमोल मिटकरी यांनीही राजकीय वेळ साधत यूपीएससीला पत्र लिहून अंजना कृष्णा यांच्या जात प्रमाणपत्रासह त्यांची इतरही शैक्षणिक कागदपत्रे तपासण्यात यावीत, अशी मागणी केली.
advertisement
राष्ट्रवादीच्या नेत्यांशी फौज अजित पवार यांच्या बचावासाठी उतरली खरी. परंतु अजित पवार यांची अंजना कृष्णा यांना धमकावतानाची पूर्ण ध्वनीचित्रफीत संपूर्ण देशात गेल्याने पक्षावर चौफेर टीका झाली. कायद्याचे धडे देणारे अजित पवार हेच जर अधिकाऱ्याला कायद्याची अंमलबजावणी करताना रोखत असतील तर प्रशासनावर नेमकी कसली पकड मानायची? असे सवाल उपस्थित होऊ लागली. विरोधकांनी देखील अजित पवार यांना त्यांच्या स्वभावावरून आणि अधिकाऱ्यांच्या नेहमी दरडावण्याच्या सुरात बोलण्यावरून सुनावले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बॅकफूटला गेला.
राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी अमोल मिटकरी यांना खडे बोल सुनावले
याप्रकरणी अधिक बोलून नाचक्की होण्यापेक्षा प्रकरणावर पदडा टाकलेला बरा असे म्हणून अजित पवार यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले. हस्तक्षेप करण्यासंदर्भात कोणताही प्रयत्न नव्हता. पोलिसांबद्दल मला नेहमीच आदर आहे, असे म्हणून त्यांनी प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र अमोल मिटकरी यांनी आयपीएस अंजना यांच्या शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी करण्याची मागणी करून एकप्रकारे त्यांच्यावर दबाव आणला. तसेच कर्तव्य कठोर अधिकाऱ्यांना कारवाई केली तर काय होऊ शकते यासंदर्भात सूचक संदेश दिला. एकीकडे पक्षाची बदनामी होत असताना आणि अजित पवार यांची प्रतिमा मलिन होत असताना मिटकरी यांच्या ट्विटच्या रूपाने त्यात अधिकच भर पडली होती. त्यामुळे मिटकरी यांच्या हेतूवर पक्षातील नेते चांगलेच संतापले.
अमोल मिटकरी यांना पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी खडे बोल सुनावले. तुमच्या ट्विटमधून पोलिसांच्या प्रमाणिकपणावर आणि कर्तव्य निष्ठेवर शंका उपस्थित होत असल्याने केलेले ट्विट माघारी घेऊन त्यावर स्पष्टीकरण द्या, असे आदेश त्यांना दिले गेले. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचे आदेश शिरसावंद्य मानून मिटकरी यांनीही ट्विट माघारी घेऊन आपले वैयक्तिक मत असल्याचे सांगितले.