याच काळात धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली. या भेटीमुळे धनंजय मुंडेंचं पुन्हा मंत्रीमंडळात कमबॅक होणार असल्याच्या चर्चा झाल्या. या सगळ्या चर्चेवर आता फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मंत्रीमंडळात समावेश करण्याबाबतची चर्चा धनंजय मुंडे यांच्या स्तरावर होत नाही, असं वक्तव्य फडणवीसांनी केलं आहे. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
advertisement
धनंजय मुंडेंनी घेतलेल्या भेटीबाबत विचारलं असता फडणवीस म्हणाले, त्यांनी (धनंजय मुंडेंनी) माझी तीन वेळा भेट घेतली आहे आणि वेगवेगळ्या कारणाने भेट घेतली आहे. कुठल्याही भेटीमध्ये मंत्रिमंडळाबद्दल चर्चा झालेली नाही. मंत्रिमंडळाची चर्चा धनंजय मुंडे यांच्या स्तरावर होत नाही, मंत्रिमंडळाची चर्चा ही मी, अजितदादा आणि एकनाथराव शिंदे करतो.
दरम्यान, गुरुवारी रात्री उशिरा विधिमंडळात रमी खेळणारे माणिकराव कोकाटे यांची कृषिमंत्रीपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. आता त्यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचा पदभार देण्यात आला आहे. तर त्यांच्या जागी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांची वर्णी लागली आहे. खरंतर, कृषी मंत्रीपद मिळाल्यापासून कोकाटे हे नाराज होते. त्यांनी कृषीमंत्रीपदाची तुलना ओसाड गावच्या पाटीलकीशी केली होती. त्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली होती. आता त्यांच्याकडून कृषी खातं काढून घेण्यात आलं असून त्यांच्याकडे क्रीडा मंत्रीपद देण्यात आलं आहे.