जळगाव : ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या घरी पोलिस आल्याने खळबळ उडाली आहे. मतदानासाठी बाहेर न पडू दिल्याचा आरोप उमेदवाराच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. सकाळी साडेसात वाजता पोलीस उमेदवाराच्या घरी आले असं कुटुंबियांचे म्हणणे आहे. पोलिसांनी २ तास घराबाहेर पडू दिले नाही. असा आरोप उमेदवाराच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर केला आहे. विशाल कापसे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणूक लढत आहे. या घटनेमुळे जळगावामध्ये खळबळ उडाली आहे.
advertisement
बोगस मतदार पकडला
दुसरीकडे, जळगाव शहरातील एका मतदान केंद्राच्या परिसरात बोगस मतदान केल्याच्या संशयावरून एका तरुणाला नागरिकांकडून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. संबंधित तरुण संशयास्पद हालचाली करत असल्याचे काही मतदारांच्या लक्षात आल्यानंतर त्याच्यावर बोगस मतदानाचा आरोप करण्यात आला. यावरून उपस्थित नागरिकांमध्ये बाचाबाची झाली आणि पाहता पाहता संतप्त जमावाने त्या तरुणाला मतदान केंद्राच्या परिसरातच चोप दिला.
पोलिसांचा तात्काळ हस्तक्षेप
घटनेची माहिती मिळताच तेथे तैनात असलेल्या पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केला. पोलिसांच्या वेळीच केलेल्या कारवाईमुळे पुढील अनर्थ टळला. मारहाणीला सामोरे गेलेल्या तरुणाला पोलिसांनी जमावाच्या तावडीतून सोडवून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी जवळच्या पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.
या घटनेमुळे काही काळ मतदान केंद्र परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीत सुरू करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेवर कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
