धंगेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन संबंधित जमीन विक्री प्रकरणात मोहोळ यांचा सहभाग असल्याचा आरोप केला आहे. ते पत्रकार परिषदेत म्हणाले की, सगळे व्यवहार संशयास्पद आहेत. सगळ्या व्यवहारात काळं आहे. त्यामुळे मोहोळ यांना राग येणं स्वभाविक आहे. त्यांची प्रेस कॉन्फरन्स केविलवाणी होती. त्यात दम नव्हता. ते हतबल होते. कारण ते चुकीच वागले, असं धंगेकर म्हणाले.
advertisement
कथित जमीन घोटाळ्यावर भाष्य करताना धंगेकर पुढे म्हणाले, "ही सगळी सुरुवात २०२३ मध्ये झाली होती. या प्रॉपर्टीचे २३० कोटी येणार असल्याचं त्यावेळी संचालकांनी सांगितलं होतं. १९५८ साली ही प्रॉपर्टी जैन मुलांसाठी घेतली होती. तेव्हाच ही संस्था सुरू झाली होती. संबंधित जागा विक्री करणं, नियमावलीमध्ये नव्हतं. विशाल गोखले आणि मुरलीधर मोहोळ आधी हॉस्टेलमध्ये गेले होते. महावीर भगवान यांच्या दर्शनाला गेल्यानंतर ही जागा कशी खाता येईल? असं त्यांच्या डोक्यात आलं. तेव्हापासून हा सगळा प्रकार समोर आला."
"गोखले यांच्या कंपनीत मोहोळ पार्टनर होते. आता ते राजीनामा दिला असं म्हणत आहेत, पण त्यांनी कधी आणि कुठं राजीनामा दिला. अजूनही ते त्या कंपनीमध्ये आहेत. आता विषय अंगावर येईल म्हणून ते पलटी खात आहेत. टेंडर प्रक्रिया मोहोळ यांना नवीन नाही. महापालिकेत त्यांनी तेच केलं आहे. बडेकर आणि गोखले यांनी व्यवस्थित ही जागा हडपली आहे. यात एकूण ३ कंपन्या होत्या. हे टेंडर मॅनेज होतं. हा सगळा व्यवहार गोलमाल करून केला आहे. सगळ्यांची दिशाभूल केली जात आहे. हे मोहोळ यांचं पाप आहे. त्यांनी जमीन खाण्याच काम केलं आहे. एक पुणेकर म्हणून मी माझी बाजू मांडत आहे. मोदींनी मोहोळ यांची चौकशी ED मार्फत चौकशी करावी", अशी मागणी धंगेकर यांनी केली.
"मोहोळ यांनी आपल्या मित्राला पाठीशी घालायचं काम केलं आहे. जर चुकीचं घडलं असेल तर गोखले आणि बडेकर यांना शिक्षा द्यावी, असं त्यांनी म्हणायला हवं होतं. पण तसं ते म्हणाले नाहीत. या प्रकरणातील सगळे बिल्डर कोथरूडचेच कसे आले? मी भाजपवर बोलत नाही, पण जे चुकलं ते चुकलं... या सगळ्यांची पार्टनरशिप आहे. आता मी देवेंद्र फडणवीस, अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करणार आहे की, त्यां याची चौकशी करावी," अशी मागणीही धंगेकर यांनी केली.