निवडणूक निर्णय अधिकारी तथा महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव महापालिकेच्या विविध प्रभागांमधून १२ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. यामध्ये सत्ताधारी महायुतीमधील भारतीय जनता पक्षाचे ६ आणि शिवसेना (शिंदे गट) ६ उमेदवारांचा समावेश आहे. संबंधित प्रभागांमध्ये इतर उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यामुळे किंवा तांत्रिक कारणास्तव प्रतिस्पर्ध्यांचे अर्ज बाद झाल्यामुळे या उमेदवारांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला होता.
advertisement
आयोगाकडे अहवाल सादर
निवडणूक प्रक्रियेचा भाग म्हणून आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी या १२ उमेदवारांचा अधिकृत तांत्रिक अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवला आहे. निवडणूक आयोगाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर आणि अधिकृत घोषणा झाल्यानंतर या उमेदवारांच्या विजयावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. सध्याच्या घडीला संबंधित उमेदवारांनी विजयी जल्लोष केला असला तरी त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे. आता निवडणूक आयोग यावर काय निर्णय घेणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
न्यायालयीन प्रक्रियेबाबत आयुक्तांचे स्पष्टीकरण
राज्यातील काही इतर महानगरपालिकांमध्ये बिनविरोध उमेदवारांच्या निवडीबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जळगावच्या परिस्थितीबाबत विचारले असता, आयुक्त ढेरे यांनी स्पष्ट केले की, जळगाव महानगरपालिकेच्या संदर्भात अद्याप कोणतीही न्यायालयीन विचारणा किंवा माहिती आयोगाकडून मागवण्यात आलेली नाही.
