नाना उर्फ ज्ञानेश्वर भिका पाटील असं हत्या झालेल्या २७ वर्षीय तरुणाचं नाव आहे. हल्लेखोरांनी त्याच्यावर धारदार चाकुने तीन वार केले होते. या गंभीर हल्ल्यात ज्ञानेश्वरचं मूत्रपिंड फाटलं. नातेवाईकांनी तातडीने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. पण मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने उपचारादरम्यान ज्ञानेश्वरचा मृत्यू झाला. हत्येची ही घटना उघडकीस येताच मयताच्या नातेवाईकांनी जीएमसीत मोठी गर्दी केली. रुग्णालय परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाल्यानंतर घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला.
advertisement
नेमकं काय घडलं?
ही घटना जळगाव शहरातील कासमवाडी परिसरात गुरुवारी मध्यरात्री घडली. जुना वाद उफाळून आल्याने दोन कुटुंबांमध्ये तुंबळ राडा झाला. या वादात नाना उर्फ ज्ञानेश्वर भिका पाटील (वय २७) या तरुणावर दोन तरुणांनी धारदार शस्त्राने तीन वार केले. या हल्ल्यात ज्ञानेश्वरच्या पोटावर, डाव्या मांडीवर व अंगावर वार झाले. या हल्ल्यात ज्ञानेश्वरचे मूत्रपिंड फाटले. जखमी अवस्थेत त्याला तातडीने जीएमसी रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
घटनेनंतर रुग्णालयात नातेवाईकांची व परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. त्यामुळे एमआयडीसी पोलिसांनी तत्काळ रुग्णालयात जाऊन बंदोबस्त वाढवला. रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान रुग्णालयात मयताच्या नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केल्याचे दिसून आलं.