पोलिसांनी जामनेरमधील रामानंदनगर परिसरातील 'कॅफे कॉलेज कट्टा'वर छापा टाकत मोठा गैरप्रकार उघडकीस आणला आहे. कॅफेत अश्लील चाळे सुरू असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. यात सात तरुण आणि सात तरुणींना आक्षेपार्ह अवस्थेत रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
जामनेर येथे नुकतीच कॅफेमध्ये मुलीसोबत बोलत असल्याच्या संशयावरून एका तरुणाची हत्या झाली होती. त्यानंतर जिल्ह्यात अवैध कॅफेंवर कारवाईची मागणी जोर धरत होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही मोहीम हाती घेतली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामानंदनगर भागातील 'कॅफे कॉलेज कट्टा'मध्ये प्लायवूडचे कंपार्टमेंट बनवून विद्यार्थ्यांना गैरकृत्यांसाठी जागा उपलब्ध करून दिली जात होती. पोलिसांनी अचानक छापा टाकला असता, सात जोडपी आक्षेपार्ह स्थितीत आढळली.
advertisement
पोलिसांनी सर्व तरुण-तरुणींच्या पालकांना बोलावून त्यांना समज दिली. या कारवाईदरम्यान कॅफेचालक मुकेश वसंत चव्हाण याच्याकडे कोणताही व्यावसायिक परवाना नसल्याचेही समोर आले. त्यामुळे कॅफेचालकाविरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. अशा अवैध कॅफेंवर भविष्यातही कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.