विजय वाघमारे, प्रतिनिधी जळगाव: जळगाव शहरातील सुंदरमोती नगर परिसरात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. इथं एका २३ वर्षीय विवाहितेनं लग्नानंतर अवघ्या चारच महिन्यात आयुष्याचा शेवट केला आहे. पतीसह सासरच्यांकडून हुंड्यासाठी होणाऱ्या छळातून तरुणीने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. पीडित तरुणीने वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात पतीसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
मयुरी गौरव ठोसर असं आत्महत्या करणाऱ्या २३ वर्षीय विवाहितेचं नाव आहे. तिने जळगाव शहरातील सुंदरमोती नगर येथील सासरच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सासरच्यांनी केलेल्या छळाला कंटाळून तिने गळफास लावून घेतला. ही घटना १० सप्टेंबर रोजी समोर आली होती. मेडिकल टाकण्यासाठी दहा लाख रुपये आणावेत, म्हणून मयुरीचा छळ सुरू असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.
अवघ्या चार महिन्यांपूर्वी, १० मे रोजी बुलढाणा जिल्ह्यातील पडाळी येथील तिचा विवाह गौरव ठोसरसोबत झाला होता. गौरव बी फार्मसी पदवीधर असून, त्याला स्वतःचे मेडिकल सुरू करायचे होते. यासाठी त्याने आणि त्याच्या कुटुंबीयांनी मयुरीकडे माहेरून दहा लाख रुपये आणावेत, असा दबाव टाकण्यास सुरुवात केली. पैशासाठी मयुरीवर सतत मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता, असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे.
मयुरीचा वाढदिवस ९ सप्टेंबरला साजरा करण्यात आला होता. मात्र दुसऱ्याच दिवशी, १० सप्टेंबर रोजी, घरात कोणी नसताना तिने गळफास लावून जीवन संपवलं. रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. या घटनेनंतर ११ सप्टेंबरला मयुरीचे वडील भगवान बुडूकले आणि तिचे कुटुंबीय जळगावात दाखल झाले. त्यांनी पती गौरव ठोसर, सासू, सासरे, दीर आणि नणंद यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी करत गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास व शवविच्छेदनास नकार दिला होता. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
मयुरीच्या वडिलांनी सांगितले की आम्ही आधीच आठ ते दहा लाख रुपये दिले होते. परंतु मेडिकल नंतर हळद तयार करण्याची कंपनी टाकण्यासाठी पुन्हा पैशांची मागणी सुरू होती. तर दुसरीकडे माझी मुलगी गेली पण दुसऱ्या कुणाचीही मुली सोबत असे होऊ नये, म्हणून आरोपींना फाशी द्या, अशा लोकांना समाजाने पाणी सुद्धा द्यायला नको, असे म्हणत मयुरीच्या आईने टाहो फोडला होता.
मयुरीच्या भावाने मोठा आरोप करताना सांगितले की, बहिणीच्या सासरचं कडून सतत पैशांची मागणी केली जात होती. तरी आम्ही धंदा उभा करण्यासाठी त्यांना आठ ते दहा लाख रुपये दिले होते. परंतु त्यांची मागणी पुन्हा पुन्हा सुरू होती. आरोपीना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी देखील केली.
या प्रकरणात पोलिसांनी गौरव ठोसर व त्याच्या भावाला अटक केली आहे, तर एकूण चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून प्रकरणात हुंडाबळीचे कलम लावले जाणार आहे. मयुरीचे नातेवाईकांनी गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु पोलिसांनी गुन्हा दाखल करून तत्काळ आरोपींना अटक केल्यामुळे सायंकाळी मयुरीचा मृतदेह नातेवाईकांनी गावाकडे नेला. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात निर्माण झालेला तणाव निवळला. दरम्यान, उच्चशिक्षित ठोसर परिवाराकडून हुंड्यासाठी मयुरीचा छळ झाला आणि त्यातूनच तिने आत्महत्या सारखा टोकाचा निर्णय घेतल्यामुळे समाजमन सुन्न झाले आहे.