ज्ञानेश्वर रामदास राठोड असं आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याचं नाव आहे. मागील अनेक वर्षांपासून ते भाजपसाठी काम करतात. त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी त्यांनी सुसाईड नोट देखील लिहिली होती. यात त्यांनी आत्महत्येचं कारण नमूद केलं होतं. प्रोजेक्ट मॅनेजरने आपलं काम अचानक बंद केलं. त्यामुळे आपण आर्थिक अडचणीत सापडलो, याच नैराश्यातून त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर राठोड हे कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतात. त्यांनी मंठा तालुक्यातील देवठाणा ते तळणी दरम्यान रस्त्याचं काम घेतलं होतं. गेल्या काही काळापासून ते हे काम करत होते. पण या कामाचं कंत्राट देणाऱ्या प्रोजेक्ट मॅनेजरने अचानक त्यांचं काम बंद केलं. शिवाय ते महिन्याला २० हजार रुपये मागत होते. पैशांची मागणी पूर्ण न केल्यानं राठोड यांची काही बिलं थकवली होती.
कामाचं बिल न मिळाल्याने राठोड हे आर्थिक अडचणीत सापडले होते. यानंतर त्यांनी कामाच्या ठिकाणीच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. पण घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या काही जणांनी तातडीने राठोड यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. वेळेत उपचार मिळाल्याने अनर्थ टळला आहे. मात्र सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्याने ऐन निवडणुकीच्या काळात अशाप्रकारे आयुष्य संपण्याचा प्रयत्न केल्याने मंठा परिसरात खळबळ उडाली आहे.
