परी दीपक गोस्वामी असं मृत आढळलेल्या तीन वर्षीय मुलीचं नाव आहे. ती माऊली नगर परिसरात एका रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात आढळून आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज (सोमवार, २० ऑक्टोबर) सकाळी काही स्थानिक नागरिकांना ही मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. त्यांनी तत्काळ तालुका जालना पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी केली आणि मुलीच्या आई-वडिलांकडे या घटनेबद्दल चौकशी केली.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या चिमुकलीचा मृत्यू भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात झाल्याचा अंदाज आहे. लहान मुलीच्या शरीरावर कुत्र्याच्या चावल्याच्या जखमा आणि ओरखडे आढळून आल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, पोलिसांनी तपास पूर्ण झाल्यावरच अंतिम निष्कर्ष काढण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.
पोलिसांची प्रतिक्रिया
या घटनेबाबत बोलताना तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे म्हणाले, "आम्हाला माऊली नगरमध्ये तीन वर्षीय मुलीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात असल्याची माहिती मिळाली. आम्ही घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. प्राथमिक तपासानुसार, भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात तिचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. आम्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. आम्ही या घटनेची पुढील चौकशी करत आहोत."