जालना: संविधान धोक्यात आहे, त्याचं संरक्षण करावं, अशी मागणी अलिकडे अनेकजण करत असतात. मात्र, जालना शहरातील एका इंजिनिअर तरुणाने संविधानाचा प्रचार प्रसाराचं व्रत हाती घेतलंय. संविधान जागृतीसाठी गिर्यारोहक विनोद सुरडकर हा तरुण दीक्षाभूमी ते चैत्यभूमी असा तब्बल 1000 किमींचा सायकल प्रवास करत आहे. 500 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून जालन्यात आल्यानंतर त्याने लोकल18 सोबत बोलताना माहिती दिलीये.
advertisement
“डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिल अवघ्या काही दिवसांवर आली आहे. त्या अनुषंगाने भारतीय जनमानसात संविधान रुजावे आणि प्रत्येकाला त्याविषयी आस्था प्रेम निर्माण व्हावं. संविधान नक्की आहे काय? हे माहित व्हावं, म्हणून मी हा सायकल प्रवास सुरू केला आहे. दरम्यानच्या काळामध्ये लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक जण विचारपूस चौकशी करत आहेत,” असं विनोद म्हणाला.
Ambedkar Jayanti 2025: बाबासाहेबांनी मुक्काम केलेलं गंगा निवास, सोलापुरात आजही जपलाय ऐतिहासिक ठेवा!
डिजिटल माध्यमाचा वापर
लोक संविधानाविषयी विचारत आहेत. डिजिटल माध्यमातून मी संविधानाचा प्रचार प्रसार करत असून माझ्याकडे दोन बारकोड आहेत. या बारकोडच्या माध्यमातून स्कॅन केल्यानंतर व्हिडिओ स्वरूपात आणि टेक्स्ट स्वरूपात संविधान उपलब्ध होते. ज्यांना जे सोयीचं आहे, त्यानुसार ते संविधानेच आकलन करू शकतात, असंही विनोदने सांगितले.
13 एप्रिलला दीक्षाभूमीवर पोहोचणार
या प्रवासादरम्यान वाढलेली उष्णता आणि बदललेले वातावरण यामुळे थोडासा त्रास जाणवत आहे. मात्र 13 एप्रिल रोजी सायंकाळपर्यंत मी दीक्षाभूमी इथे पोहोचणार आहे. हा प्रवास करून अत्यंत आनंद मिळाला. याआधी देखील मी जालना ते स्टॅच्यू ऑफ युनिटी, जालना ते कळसुबाई शिखर प्रवास केला आहे. तसेच पर्यावरणपुरक वारी अंतर्गत जालना ते पंढरपूर रस्त्यावर सीड्स बॉल टाकण्याची मोहीम हाती घेतली. एक पर्यावरण प्रेमी आणि सजग नागरिक म्हणून मला या गोष्टी केल्यानंतर समाधान मिळत असल्याचे विनोद सुराळकर यांनी सांगितलं