जालना : छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. शिवरायांची जयंती राज्यभरात मोठ्या उत्साहानं साजरी करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जालन्यातील फिटनेस फंडा नावाचा ग्रुप शरीर आणि मन तंदुरुस्त कसे ठेवावे या विषयाकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतोय. शिवजयंतीनिमीत्त ते फिटनेस विषयक जनजागृती करत आहेत.
जालना जिल्ह्यातील रामनगर येथील कैलास डवले, सोपान शेजुळ, तुकाराम ठोंबरे तसेच इतर मित्र कंपनीने पाच वर्षांपूर्वी फिटनेस फंडा नावाचा मित्रांचा एक समूह तयार केला. समाजामध्ये शारीरिक तंदुरुस्ती विषयी जनजागृती करणे हा या ग्रुपचा प्रमुख उद्देश होता. समाजात साजऱ्या होणाऱ्या विविध जयंती तसेच अनेक अन्य सामाजिक उपक्रम यामध्ये या तरुणांनी फिटनेस या विषयाचा देखील समावेश केला. मागील पाच वर्षांपासून माँसाहेब जिजाऊ यांचे जन्मस्थान असलेल्या सिंदखेड राजा येथून शिवज्योत हा ग्रुप रामनगर येथे घेऊन येतो. यातून फिटनेस विषयी जागृती तसेच शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रचार प्रसार हा उद्देश असल्याचं ग्रुपच्या सदस्यांनी सांगितलं.
advertisement
18 फेब्रुवारी रोजी शिवज्योत आणण्याचे नियोजन ग्रुपच्या सदस्यांकडून केलं जातं. 19 फेब्रुवारीच्या सकाळी 3 वाजता ग्रुपमधील सदस्य सिंदखेड राजा येथे जातात. सकाळी पाच वाजता शिवज्योत पेटवून प्रत्येक सदस्य दहा ते बारा किमी अंतर शिवज्योत घेऊन पार करतो. सकाळी आठ वाजेच्या सुमारास रामनगर येथे ही शिवज्योत आणली जाते. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये जय भवानी जय शिवाजी जयघोषार या शिवज्योतीचं स्वागत केलं जातं. त्यानंतर दिवसभर ही शिवज्योत गावातील मंदिरात तेवत राहते सायंकाळच्या सुमारास गावातून छत्रपती शिवरायांची भव्य मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीमध्ये सिंदखेडराजा इथून आणलेली ही शिवज्योत प्रमुख आकर्षण असतं, असं ग्रुपचे सदस्य अॅडव्होकेट तुकाराम ठोंबरे यांनी सांगितलं.
तरुण मुलांमध्ये वेगवेगळ्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. यामुळे आमच्या डॉक्टर मित्रांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा ग्रुप तयार केला. वर्षभर वेगवेगळे उपक्रम या माध्यमातून सुरू असतात. तरुणांनी शरीर आणि मन तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी जागृती करण्याचा काम आमच्या ग्रुप मार्फत करण्यात येतं, असं ग्रुपचे अध्यक्ष कैलास डवले यांनी सांगितलं.